पोलीस कोठडी मागणी फेटाळली
व्हिसेरा आणि अन्य तपासणी अहवाल ठरणार महत्त्वाचे
कणकवली : महिला पोलीस हवालदार स्मिता माने यांच्या मृत्यू प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपी पोलीस कॉन्स्टेबल पती सचिन माने याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने तपास यंत्रणेकडून आणखी पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात आली होती. मात्र, तिसरे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी ओरोस येथील एस. पी. पाटील यांनी पोलिसांची ही मागणी फेटाळून लावत संशयित आरोपी सचिन माने याला न्यायालयीन कोठडी सुनावली.
या प्रकरणातील संशयित आरोपी सचिन माने याला १३ ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी तपास यंत्रणेकडून सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली होती. ही मुदत संपत असल्याने तपासासाठी आणखी पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी पोलिसांकडून करण्यात आली. यावेळी संशयित आरोपीच्या वतीने अॅड. भूषण बिसुरे आणि अॅड. नेहा ताम्हणकर यांनी युक्तिवाद केला. अॅड. नेहा ताम्हणकर यांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने पोलिसांची पोलीस कोठडी वाढविण्याची मागणी फेटाळून लावली आणि संशयित आरोपीला न्यायालयीन कोठडी दिली.
दरम्यान, स्मिता माने यांचा मृतदेह राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आला होता. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे निश्चित कारण नमूद करण्यात आलेले नसून व्हिसेरा जतन करून ठेवण्यात आला आहे. अहवालात Evidence of pressure mark around neck in advanced decomposed body samples kept for viscera and accessory examination reports अशी नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात व्हिसेरा आणि अन्य तपासणी अहवाल महत्त्वाचे ठरणार आहेत.












