कोजागरी कविसंमेलन अध्यक्षपदी वीरधवल परब

सावंतवाडी : प्रतिनिधी

सिंधुदुर्ग साहित्य संघातर्फे श्रीराम वाचन मंदिरच्या सहयोगाने यंदाचे कोजागरी कविसंमेलन शनिवार २४ ऑक्टोबर रोजी आयोजित केले आहे. या कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी वीरधवल परब यांची निवड करण्यात आली आहे. श्रीराम वाचन मंदिरच्या कवी केशवसुत सभामंडपात सायंकाळी ५.३० वाजता हे संमेलन होत आहे.

कवी वीरधवल परब यांचे मम् म्हणा फक्त आणि दरसाल दरशेकडा हे काव्यसंग्रह प्रसिद्ध असून गोमागणेश पितळी दरवाजा हा काव्यसंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे. त्यांच्या कविता, समीक्षा आणि वैचारिक लेखन विविध नियतकालिकातून प्रसिद्ध झाले आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाचा कवी केशवसुत पुरस्कार तसेच महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. ते प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

सिंधुदुर्ग साहित्य संघातर्फे गेली ५२ वर्षे कोजागरी कवी संमेलन आयोजित केले जाते. आजवर विंदा करंदीकर, बा. भ. बोरकर, मंगेश पाडगावकर, दिलीप चित्रे यांच्यासह अनेक मान्यवर कवींनी संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविले आहे. अनेक कवीनी या व्यासपीठावरून आपली पहिली कविता सादर केली आहे. दरवर्षी जिल्हाभरातून प्रथितयश आणि नवोदित कवी या संमेलनात सहभाग घेतात.

यंदाच्या कविसंमेलनात जिल्ह्याभरातील कवीनी सहभागी व्हावे व सहभाग नोंदणीसाठी कार्याध्यक्ष विठ्ठल कदम आणि सचिव मनोहर परब यांच्यासाठी संपर्क साधावा असे आवाहन, सिंधुदुर्ग साहित्य संघाचे अध्यक्ष लीलाधर घाडी आणि कार्याध्यक्ष विठ्ठल कदम ९८२३०४८१२६ यांनी केले आहे.