राजेश पडवळ यांचा “रक्तदूत गौरव” पुरस्काराने सन्मान 

वैभववाडीत रक्तदान चळवळीत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल गौरव 

वैभववाडी l प्रतिनिधी :      वैभववाडी येथे रक्तदान चळवळीत उल्लेखनीय योगदान देणारे राजेश पडवळ यांना ‘रक्तदूत गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. जीवनधारा ब्लड बँक कोल्हापूर यांच्या मार्फत हा पुरस्कार देण्यात आला आहे. यावेळी सहाय्यक अधिकारी नयनिश मोरे उपस्थित होते.

बुधवारी सार्वजनिक दुर्गा माता उत्सव मंडळ वैभववाडी यांच्या वतीने रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरात पडवळ यांनी ३२ वे रक्तदान केले. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

राजेश पडवळ हे गेल्या आठ वर्षांपासून सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान, वैभववाडीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. वैभववाडी तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांनी शेकडो रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे. रक्तदानाबाबत जनजागृती करणे, अधिकाधिक नागरिकांना रक्तदानासाठी प्रोत्साहित करणे आणि गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देणे, हे त्यांच्या कार्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

रक्ताची गरज असलेल्या गोरगरीब रुग्णांना मदतीचा हात देण्यासाठी त्यांनी रक्तदात्यांचे जाळे निर्माण करण्यावर भर दिला आहे. रक्तदान ही सामाजिक जबाबदारी असून, त्यातून अनेकांचे प्राण वाचू शकतात, हा संदेश त्यांनी आपल्या कार्यातून दिला आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण सामाजिक योगदानाची दखल घेऊन त्यांना ‘रक्तदूत गौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.

या वेळी दुर्गामाता उत्सव मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पाताडे, सिंधुदुर्ग व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय सावंत, वैभववाडी तालुकाध्यक्ष तेजस आंबेकर, प्रतिष्ठानचे संस्थापक शांताराम काका रावराणे तसेच व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.