वेंगुर्ले न.प. तर्फे सुंदर भाटले येथे लोकसहभागातून वनराई बंधारा पूर्ण…

लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे श्रमदान…

वेंगुर्ले : दाजी नाईक

बदलत्या हवामानामुळे उद्भवणारी संभाव्य पाणीटंचाई आणि भूजल पातळी खालावण्याचा धोका लक्षात घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलसंवर्धनाची व्यापक चळवळ सुरू आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून, वेंगुर्ला नगरपरिषदेच्या वतीने सुंदर भाटले येथे लोकसहभागातून वनराई बंधारा पूर्ण करण्यात आला असून, यामध्ये लोकप्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांनी श्रमदान केले. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही आजच्या काळाची गरज ओळखून प्रशासकीय पातळीवर राबवण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला आहे.

*नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्यासह सर्वांचा सहभाग*

जलसंधारण ही केवळ शासकीय यंत्रणेची जबाबदारी नसून ती एक लोकचळवळ व्हावी, हा संदेश देत वेंगुर्ला नगरपरिषदेच्या लोकप्रतिनिधी व प्रशासनाने स्वतः मैदानात उतरून श्रमदान केले. या मोहिमेत नगराध्यक्ष श्री. दिलीप गिरप आणि मुख्याधिकारी श्री. हेमंत किरुळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली हा बंधारा झाला. या श्रमदान मोहिमेत क्रीडा व सांस्कृतिक सभापती श्री. सचिन शेटये, बांधकाम सभापती श्री. प्रणव वायंगणकर, स्वच्छता व आरोग्य सभापती सौ. गौरी माईणकर, नगरसेवक श्री. संदेश निकम, श्री. प्रशांत आपटे, श्री. सदानंद गिरप, श्री. प्रितम सावंत, तसेच नगरसेविका सौ. सुमन निकम, सौ. सुषमा प्रभुखानोलकर, सौ. शीतल आंगचेकर, सौ. समिधा रेडकर आणि सौ. लीना म्हापणकर यांनी नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह स्वतः हातात घमेले-फावडे घेऊन श्रमदान केले. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून सिमेंटच्या रिकाम्या पोत्यांमध्ये माती-वाळू भरून हा पारंपारिक व कमी खर्चाचा वनराई बंधारा उभारण्यात आला.

सुंदर भाटले परिसरातील वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत जिरवणे हा या बंधाऱ्याचा मुख्य उद्देश आहे. या जलसाठ्यामुळे परिसरातील विहिरी, बोअरवेल आणि इतर नैसर्गिक जलस्रोतांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ होणार आहे.