राष्ट्रीय एकतेचा संदेश देणाऱ्या पोलीस दलाच्या राष्ट्रीय मोटार सायकल रॅलीचे बुधवारी २१ रोजी राजापुरात आगमन

राजापूर पोलीस दलाच्या वतीने हातिवले येथे होणार जंगी स्वागत
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडून २१ व २२ रोजी विविध कार्यक्रमांचे नियोजन

राजापूर प्रतिनिधी : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता आणि जनजागृतीचा संदेश देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या नॅशनल मोटार सायकल रॅली २०२६ च्या स्वागतासाठी रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. ही रॅली २१ ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यातून प्रवास करणार असून, राजापूर तालुक्यातील खारेपाटण ते कशेडी घाट या मार्गावरून तिचे मार्गक्रमण होणार आहे. राजापुरात बुधवारी २१ रोजी या रॅलीचे आगमन होणार असुन राजापूर पोलीस दलाच्या वतीने हातिवले येथे या रॅलीचे भव्य स्वागत केले जाणार आहे.
सरदार वल्लभभाई पटेल यांची १५१ वी जयंती निमित्त दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी स्टॅच्यू ऑफ युनिटी, केवडीया, गुजरात येथे राष्ट्रीय एकता परेड आयोजित करण्यात आली आहे. या राष्ट्रीय परेड निमित्त नॅशनल मोटार सायकल रॅली आयोजित करण्यात आलेली आहे. या नॅशनल मोटार सायकल रॅलीमध्ये सहभागी असलेले संघ कर्नाटक, गोवा, केरळ, लक्षद्विप पोलीस दलातील आहेत. हे दिनांक २१ व २२ अ ऑक्टोबर या कालावधीत ही रॅली रत्नागिरी जिल्ह्यातून खारेपाटण ते कशेडी घाट मार्गक्रमण करणार आहे.
गुजरातमधील केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि जनजागृतीचा संदेश देणाऱ्या या मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक नितिन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयात या रॅलीच्या स्वागतासाठी नियोजन केले जात आहे. स्थानिक प्रशासन, पोलीस अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यात समन्वय या रॅलीचे स्वागत केले जाणार आहे. यावेळी स्थानिक कला-संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या कार्यक्रमांचेही आयोजन केले जाणार आहे. तर अमली पदार्थविरोधी जनजागृती : ‘फाइट अगेन्स्ट ड्रग्ज’ या विषयावर जनजागृतीपर उपक्रम आणि संदेश दिला जाणार आहे. राष्ट्रीय एकात्मता, देशभक्ती आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविणाऱ्या या रॅलीच्या स्वागतासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.
सिंधुदुर्ग येथून रत्नागिरी जिल्हयात २१ रोजी सायंकाळी ४ वाजता या रॅलीचे राजापुरात आगमन होणार आहे. राजापुरात हॉटेल ग्रीन पार्क येथे या रॅलीचे राजापूर पोलीस दलाच्या वतीने स्वागत केले जाणार आहे. उपविभागिय अधिकारी सुरेश कदम व राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या नेतृत्वाखाली या रॅलीचे राजापुरात स्वागत होणार आहे ढोल ताशांच्या गजरात या रॅलीचे स्वागत करण्यात येणार आहे. या ठिकाणी अल्पोपहार करून ही रॅली पुढे रत्नागिरीकडे रवाना होणार आहे. या मार्गावर लांजा, पाली, हातखंबा या ठिकाणी या रॅलीचे पोलीस दलाकडून स्वागत होणार असून रत्नागिरी मुख्यालयात या रॅलीचा २१ रोजी मुक्काम असणार आहे. त्यानंतर ही रॅली २२ रोजी संगमेश्वर, चिपळूण व खेड वरून पुढे रवाना होणार आहे.
राजापुरात होणाऱ्या या रॅलीच्या स्वागत समारंभ प्रसंगी सगळयांनी उपस्थित रहावे असे आवाहन पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी केले आहे.