पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आठ वनराई बंधारे
शिरगाव (प्रतिनिधी) : या वर्षी अल निनो या नैसर्गिक घटनेमुळे हवामान आणि शेतीवर परिणाम झाला आहे. पर्जन्यमान घटल्यामुळे पाणीपातळी झपाट्याने खालावत चालली आहे. भविष्यात उद्भवणारी पाणीटंचाई टाळण्यासाठी आणि उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत देवगड तालुक्यातील साळशी ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या सहकार्याने ओहोळांवर आठ वनराई बंधारे उभारले.
अल निनोमुळे भारताचा मान्सून कमजोर होऊन सरासरीपेक्षा कमी पाऊस कोसळला. याचा शेती आणि पाण्याच्या साठ्यांवर मोठा ताण निर्माण होऊ लागला आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने भूजलपातळीवरही परिणाम होत असून, उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत पावसाचे पाणी अडवून त्याचा विनियोग करण्यासाठी जलसंधारणाच्या उपाययोजना करणे आवश्यक बनले आहे.
या पार्श्वभूमीवर साळशी ग्रामपंचायतीने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी वनराई बंधारे उभारण्याचा उपक्रम हाती घेतला. साळशी गावातील पलीकडील गावकरवाडी बनाचा ओहोळ व देवकोंड येथे सहा, तर देवणेवाडी येथे दोन बंधारे उभारण्यात आले. अशा प्रकारे एकूण आठ वनराई बंधारे उभारून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा उपक्रम राबविण्यात आला. पावसाचे पाणी ओहोळातून वाहून जाण्याऐवजी ते अडवून ठेवणे आणि जमिनीत मुरविणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
वनराई बंधाऱ्यांमुळे परिसरातील पाणी जमिनीत मुरण्यास मदत होऊन भूजलसाठ्यात वाढ होण्यास हातभार लागणार आहे. याचा फायदा परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होण्यासाठी होऊ शकतो. तसेच उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता टिकवून ठेवण्यासाठी अशा प्रकारचे बंधारे उपयुक्त ठरतात. गावातील शेती आणि बागायती क्षेत्रासाठी पाण्याची उपलब्धता वाढण्याबरोबरच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासही या उपक्रमाचा उपयोग होणार आहे.
या उपक्रमात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत श्रमदान केले. ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत प्रतिनिधी, अंगणवाडी सेविका, बचत गट प्रतिनिधी, पोलीस पाटील, सीआरपी, आरोग्य सेवक, मराठी शाळा व हायस्कूलमधील शिक्षक व विद्यार्थी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. विविध घटकांनी एकत्र येऊन श्रमदानातून वनराई बंधारे उभारल्याने गावातील सामूहिक सहभागाचे दर्शन घडले.
पाणीटंचाईच्या संभाव्य संकटावर मात करण्यासाठी केवळ पावसावर अवलंबून न राहता उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. साळशी ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या सहकार्याने राबविलेल्या या उपक्रमातून जलसंधारणाचा संदेश देण्यात आला असून, पाणी साठवणूक आणि भूजलपातळी वाढविण्यासाठी सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.













