मांडकी गावातील ३५ वर्षांचा वाद मिटला; यंदा एकोप्याचे सोने लुटणार!

दोन्ही गट एकत्र; सामाजिक सलोखा आणि एकजुटीचा नवा आदर्श

चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील मांडकी गावात गेल्या ३५ वर्षांपासून असलेले मतभेद दूर झाले असून दोन्ही गटांनी एकत्र येण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा गावात तब्बल साडेतीन दशकांनंतर एकत्रितपणे दसरा साजरा होणार आहे. ग्रामस्थांच्या या निर्णयामुळे गावात आनंदाचे वातावरण असून, सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे गावात दोन गट पडले होते. त्यामुळे दसरा, महाशिवरात्र आणि शिमग्यासारखे पारंपरिक सण एकत्रितपणे साजरे करण्यात अडचणी येत होत्या. मात्र, गावाची एकजूट आणि सामाजिक सलोखा जपण्याच्या उद्देशाने ग्रामस्थांनी जुने मतभेद बाजूला ठेवत सामंजस्याचा मार्ग स्वीकारला. यापुढे सर्व धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव एकत्रितपणे साजरे करण्याचा निर्धारही त्यांनी केला आहे. मान्यवरांच्या सहकार्याने एकजुटीचा निर्णय या प्रक्रियेत मांडकी गावचे उपसरपंच संतोष खैर, खोत नारायण खैर, मांडकी बुद्रुकचे सरपंच अनंत खांबे, पोलीस पाटील सचिन खैर, मांडकी खुर्दचे सरपंच सोनू धुमक, पोलीस पाटील संजय धुमक, संदीप खांबे, डॉ. ज्ञानेश्वर खांबे, तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक आबा साहेब पाटील आणि आमदार शेखर निकम यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मांडकी गावाशी जिव्हाळ्याचे संबंध असलेले आ. शेखर निकम यांनी दूरध्वनीद्वारे ग्रामस्थांचे अभिनंदन करून या निर्णयाबद्दल शुभेच्छा दिल्या.
धार्मिक उत्सव, मानपान आणि पारंपरिक प्रथांवरून गावांमध्ये मतभेद निर्माण होतात. अशावेळी संवाद आणि परस्पर आदरातून प्रश्न सोडवता येतात, हे मांडकीच्या ग्रामस्थांनी दाखवून दिले आहे. त्यांचा हा निर्णय इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरू शकतो. यंदाचा दसरा मांडकीवासीयांसाठी केवळ सण नसून, जुन्या कटुतेवर मात करून नव्याने नाती जोडण्याचा आणि गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र वाटचाल करण्याचा उत्सव ठरणार आहे. ‘एक गाव, एक विचार, एकजूट आणि एकच जल्लोष!’ या भावनेतून मांडकी गावाने सामाजिक ऐक्याचा नवा आदर्श निर्माण केला आहे.