सावर्डे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद
चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील कोंडमळा निवाचीवाडी येथे वासुदेव बयाजी सावर्डेकर (४०) यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वासुदेव बयाजी सावर्डेकर हे कोंडमळा निवाचीवाडी येथील रहिवासी होते. दि. १७ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजेपर्यंतच्या कालावधीत ही घटना घडल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे. या घटनेची खबर सुहास रघुनाथ सावर्डेकर यांनी दिली. मृत वासुदेव सावर्डेकर हे त्यांचे सख्खे चुलते होते. त्यांनी दिलेल्या माहितीत वासुदेव सावर्डेकर यांना दारूचे अति व्यसन होते. घराच्या समोरील बाजूस असलेल्या खिडकीच्या लोखंडी ग्रीलला नायलॉनची दोरी बांधून वासुदेव यांनी गळफास घेतल्याचे खबर देणाऱ्याने पोलिसांना सांगितले. या घटनेची नोंद सावर्डे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून, या प्रकरणी पोलीस पुढील कार्यवाही करीत आहेत.













