हे कसलं प्रेम… विकृती…!

‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं,’ हे कवी मंगेश पाडगावकर यांचं प्रेमावरचं काव्य. त्यातली सुंदरता आणि त्यातला ओलावा, जिव्हाळा, कमालीचा आपलेपणा या ‘प्रेम’ शब्दालाच जेव्हा काळिमा फासणाऱ्या घटना समाजात घडतात; तेव्हा ते एकतर्फी प्रेम असो किंवा दोघांच्या सहमतीचं प्रेम असू देत, प्रेम या शब्दाची जागा जेव्हा विकृती आणि निर्घृणपणा घेते, तेव्हा जे घडतं ते सारं अकल्पितच असतं. दोन दिवसांपूर्वी दामिनी किरण पालव या तरुणीचा तिच्याच कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने अतिशय निर्घृणपणे चाकूचे वार करत खून केला. या घटनेने अखंड सिंधुदुर्ग जिल्हा हादरला आहे. एखाद्या तरुणामध्ये प्रेम झालं किंवा प्रेम असलं, म्हणून इतका आंधळेपणा येऊ शकतो? विवेक आणि विचारांची जागा अविचार घेऊ शकतो, याचे निश्चितच आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही.
२४ वर्षीय दामिनी किरण पालव ही विद्यार्थिनी हॉटेल मॅनेजमेंटच्या महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तर या प्रकरणातील संशयित साहिल विश्राम धुरी याने दामिनीची घरी जाण्याची एस.टी. बस, तिची वेळ, वर्दे गावात घरी पायी जाण्याचा रस्ता, निर्मनुष्य रस्ता याची रेकी केली आणि त्यानंतर दामिनीला एकटी गाठून तिचा खून केला. साहिल धुरीच्या या नीच कृत्याने दामिनी आणि तिच्या पालकांनी पाहिलेल्या स्वप्नांचा चुराडा झाला. प्रत्येक पालक आपल्या मुला-मुलींच्या भविष्याचं एक चित्र रेखाटून असतो. आपला मुलगा किंवा मुलगी भविष्यात काहीतरी करेल, अशा आशा-अपेक्षा ठेवून असतो. परंतु, जी दामिनी सकाळी कॉलेजला गेली, तिचा मृतदेहच पालव कुटुंबाच्या घरी परतला.
ज्या पद्धतीने साहिल धुरी याने दामिनी पालव या विद्यार्थिनीचा खून केला, ते पाहिल्यावर साहिलने एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे वार केल्याचे दिसते. यात आणखी विशेष संतापजनक बाब म्हणजे, दामिनीचा खून करून आपण त्या गावचेच नाही आणि जणू आपल्या हातून काहीच घडले नाही असं भासवत, घरी कोणालाही कोणतीही कल्पना येऊ न देता तो रोजच्याप्रमाणे जेवण करून निवांत झोपला. हा सर्व घटनाक्रम पाहिल्यावर साहिल धुरी याच्यात एक विकृत प्रवृत्तीचा नीच माणूस दडल्याचे स्पष्ट होते.
दामिनी पालव खून प्रकरणाचा तपास कुडाळ पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) विभाग करत आहेत. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा असा तपास करायला हवा की, संशयित आरोपी साहिल धुरी याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. या घटनेत जरी दामिनीचा खून होताना पाहणारा प्रत्यक्षदर्शी कोणी नसला, तरीही त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज, साहिलचा मोबाईल सीडीआर, कडावल मार्गावर साहिल धुरीला प्रवास करताना पाहणारे किंवा साहिल धुरीचे अन्य कोणा मित्र-मैत्रिणींशी बोलणं झालं का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधत तपास परिपूर्ण झाला पाहिजे. न्यायालयीन प्रक्रियेत कोणत्याही त्रुटीचा किंवा संशयाचा फायदा या प्रकरणातील संशयित आरोपी साहिल धुरी याला मिळता कामा नये. पोलिसांना जरी या प्रकरणातील संशयित आरोपी सापडला असला, तरीही या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी.
बऱ्याच वेळा पोलीस सुरुवातीचे दोन-तीन दिवस तपास करतात आणि त्यानंतर तपासकाम गुंडाळतात. मग न्यायालयात जेव्हा त्या केसचा खटला चालतो, तेव्हा पोलीस तपासातील दोष किंवा कधीकधी जाणीवपूर्वक केलेल्या चुकांमुळे आरोपी निर्दोष सुटण्यास मदत होते. मग कधीतरी गंभीर आणि समाजात खळबळ उडवणाऱ्या खटल्यातही आरोपी निर्दोष सुटलेला असतो. त्यामुळेच दामिनी पालवच्या या खून प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी अधिक दक्षतेने काम केले पाहिजे. चार दिवसांपूर्वीच्या घटनेत दामिनी पालवचा बळी गेला असला, तरीही सिंधुदुर्गात ‘दामिनी पालवचा खून’ ही घटना शेवटची ठरावी, असं काम या संपूर्ण प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी करणं अपेक्षित आहे. जेणेकरून साहिल धुरी या नीच कृत्य करणाऱ्या तरुणाला कठोर शिक्षा होईल आणि तरच खऱ्या अर्थाने दामिनी पालव या तरुणीला न्याय मिळेल.













