पालिकेच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात
सावंतवाडी । प्रतिनिधी :
सावंतवाडी शहराच्या सीमेवर असलेल्या नगरपालिकेच्या कचरा डेपोला आज दुपारी अचानक आग लागली. या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते. मात्र, पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने हालचाल केल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
येथील कचरा डेपोमध्ये मोठ्या प्रमाणावर सुका कचरा साठवला जातो. आज दुपारच्या सुमारास या कचऱ्याला अचानक आग लागली. आगीने उग्र रूप धारण केल्यामुळे धुराचे लोट परिसरात पसरले होते, ज्यामुळे काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी अग्निशमन दलासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. या मोहिमेत स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत, अक्षय पंडित, शेखर मेहत्तर, अग्निशमन दलाचे नंदू गावकर व इतर कर्मचारी सहभागी झाले होते. वेळेत मदत पोहोचल्यामुळे मोठी हानी टळली आहे.













