दसरा सणानिमित्त विजय म्युजिक अकॅडमीत विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न

वाद्यपूजन, गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण आणि संगीत कलांचे सादरीकरण

मंडणगड (प्रतिनिधी)  : दसरा सणाचे औचित्य साधून विजय म्युजिक अकॅडमीच्या वतीने वाद्यपूजन, अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या तबला व संवादिनी वादन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांच्या सादरीकरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अकॅडमीच्या संचालिका सौ. वृंदा साळुंके यांनी उपस्थित विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि पालकांचे स्वागत केले. प्रास्ताविकात त्यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही अकॅडमीचा निकाल शंभर टक्के लागल्याबद्दल समाधान व्यक्त करत सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
मुलींचाही शास्त्रीय संगीताकडे वाढता कल
संगीतकला आत्मसात करण्यासाठी मुलांप्रमाणेच मुलीही तबला, ढोलकी आणि हार्मोनियम वादनाचे शास्त्रशुद्ध ज्ञान घेण्यास उत्सुक असल्याचे पाहून आनंद होत असल्याचे सौ. वृंदा साळुंके यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचा वाढता सहभाग पाहता भविष्यात विजय म्युजिक अकॅडमीचे संगीत विद्यालयात रूपांतर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
यानंतर संगीत शिक्षक अक्षय साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित विद्यार्थी आणि मान्यवरांच्या हस्ते विविध संगीत वाद्यांचे विधिवत पूजन करण्यात आले.
यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या तबला वादन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आर्यन मनवे, वरद शिवगण, अनुज गावडे, प्रीती गायकवाड, अभंग सवादकर आणि अथर्व पदरत यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. तसेच संवादिनी वादन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्वज्ञ गोरेगावकर आणि गंधर्व सुर्वे यांचाही मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने रंगला संगीताचा कार्यक्रम
प्रमाणपत्र वितरणानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या संगीतकलेचे बहारदार सादरीकरण केले. आर्यन मनवे आणि प्रीती गायकवाड यांनी त्रितालातील फर्माईशी चक्रधार सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. त्यांना संवादिनीवर धर्मेश कडाळी याने लहऱ्याची साथ दिली.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी तिरकिट आणि धातीत्त या बोलांवर आधारित कायदे व पलटे सादर केले. या सादरीकरणाला संवादिनीवर जोया पठाण हिने साथ दिली. संवादिनीवर इतर विद्यार्थ्यांनी राग बागेश्री आणि राग आसावरी यांतील बंदिशी सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तिला तबल्यावर अभंग सवादकर आणि सई पुरारकर यांनी साथसंगत केली.
विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे कार्यक्रमात उत्तरोत्तर रंगत वाढत गेली. कार्यक्रमाच्या शेवटी अकॅडमीचे संचालक व संगीत विशारद अक्षय साळुंके यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक तसेच अकॅडमीचे आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.