मंत्री नितेश राणे यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह टिप्पणी; भाजपकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी

रत्नागिरी : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. नितेश राणे यांच्या बाबत फेसबुकवर खालच्या स्तराची आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी संबंधित समाजकंटकावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. भाजपा रत्नागिरी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष श्री.प्रशांतजी यादव यांच्या सूचनेनुसार ,जिल्हा उपाध्यक्ष श्री. अशोक गणपत वाडेकर यांनी आज पोलीस अधीक्षक कार्यालयात लेखी निवेदन सादर केले.

निवेदनात म्हटले आहे की, भाजप नेते आणि राज्याचे प्रतिष्ठित मंत्री नितेशजी राणे हे हिंदुत्ववादी नेते असून महाराष्ट्रभर आपले विचार ते जनतेसमोर मांडत असतात. अशातच एका समाज कंटकाने फेसबुक कमेंटद्वारे त्यांच्यावर खालच्या पातळीवर टिप्पणी केली आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून सरकार आणि प्रशासनाची प्रतिष्ठा मलिन करण्याचा हा प्रकार आहे. संबंधित पुराव्यांची पडताळणी करून त्या समाजकंटकावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी श्री. वाडेकर यांनी केली आहे. या निवेदनासोबत संबंधित आक्षेपार्ह कमेंटचे पुरावेही पोलिसांना जोडून देण्यात आले आहेत. यावेळी पोलीस अधीक्षक कार्यालयात हे निवेदन देण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक वाडेकर, शहर सरचिटणीस नगरसेवक संदीप सुर्वे, संदीप रसाळ, निलेश आखाडे, भक्ती दळी, अजिंक्य केसरकर, संतोष सावंत, शैलेंद्र बेर्डे, सारिका शर्मा, संगीता कवितके,अमोल देसाई, संजीव बने,प्रणव सुर्वे ,नरेश बनसोडे ,निखिल शेट्ये, अथर्व करमरकर, श्रीनाथ सावंत, अभी कारेकर अभिलाष पिलणकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.