मडूरेत ‘खेळ रंगला नारी शक्तीचा’ स्पर्धेत माया परब विजेती

मडूरा परब मित्रमंडळाचे आयोजन 

बांदा : प्रतिनिधी 

मडूरा येथे नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मडूरा परब मित्रमंडळाच्या वतीने महिलांसाठी ‘खेळ रंगला नारी शक्तीचा’ या विशेष स्पर्धात्मक खेळाचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत माया शंकर परब हीने प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळवले. सौ. प्राही प्रसाद परब या उपविजेत्या ठरल्या.

 

या अनोख्या स्पर्धेत एकूण सात फेऱ्यांचा समावेश होता. या सर्व फेऱ्यांमधून महिलांचा चांगलाच कस लागला. विविध बौद्धिक आणि शारीरिक कौशल्यांवर आधारित असलेल्या या सात फेऱ्यांमधील खेळांना महिला व युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संपूर्ण स्पर्धेत मडूरा गावातील एकूण ३० महिला व युवतींनी सहभाग नोंदवला.

 

नवरात्रौत्सव समिती अध्यक्ष सिद्धेश परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उदघाटन झाले. यावेळी केशव परब, प्रवीण परब, भूषण परब, सखाराम परब, संतोष परब, प्रशांत परब आणि रुपेश परब आदी उपस्थित होते.

 

उपांत्य फेरीसह अंतिम फेरी अत्यंत चुरशीची झाली. अंतिम फेरी टाय झाल्याने स्पर्धेतील चुरस वाढतच गेली. अखेर माया परब हीने अतिरिक्त एका गुणाची कमाई करत प्रथम क्रमांकाचे कपाट बक्षीस मिळविले.

 

पोलीस पाटील नितीन नाईक यांच्या बहारदार निवेदनाने कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढली. स्पर्धेचे गुणलेखन प्रवीण परब यांनी केले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मडूरा परब मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

———-