कणकवलीतून एसटीने एकट्याच बीडवाडीत गेल्याचे फुटेजमध्ये दिसल्याची माहिती
शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा
कणकवली : कणकवली पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार स्मिता सचिन माने यांच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे. कणकवली ते बीडवाडी मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासताना स्मिता माने या एसटी बसने एकट्याच बीडवाडीकडे गेल्याचे दिसून आल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित एसटी बसच्या वाहकानेही त्या बसमधून प्रवास करत असल्याचे सांगितल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या माहितीमुळे तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे धागेदोरे मिळाले असले, तरी स्मिता माने यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूमागील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
स्मिता माने या ९ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास कळमठ-नाडकर्णी नगर येथील राहत्या घरातून बेपत्ता झाल्या होत्या. त्यानंतर दोन दिवसांनी, म्हणजेच ११ ऑक्टोबर रोजी बीडवाडी-हुंबरणे येथील जंगलात त्यांचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेने सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूमागील कारण काय, याबाबत विविध प्रश्न उपस्थित झाले होते.
या प्रकरणी स्मिता माने यांची बहीण रेशमा जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत पती सचिन माने यांच्या जाचाला कंटाळून स्मिता यांनी आत्महत्या केली असावी किंवा सचिन माने यांनी त्यांचा घातपात केला असावा, अशी शंका व्यक्त केली होती. या फिर्यादीच्या आधारे कुडाळ पोलिसांनी तपास करत सचिन माने यांना अटक केली. पोलीस कोठडीनंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास करताना कुडाळ पोलिसांनी कणकवली ते बीडवाडी मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. या तपासणीत दोन ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्मिता माने दिसून आल्याची माहिती आहे. त्या कणकवलीहून बीडवाडीच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसमध्ये चढतानाही दिसल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित बस बीडवाडीच्या दिशेने गेली होती. स्मिता माने यांचा मृतदेह ज्या ठिकाणी आढळून आला, त्या घटनास्थळाजवळील मंदिराच्या दिशेने जाऊन त्या पुन्हा माघारी फिरल्याची माहितीही तपासादरम्यान समोर आल्याचे सांगितले जात आहे.
सीसीटीव्ही फुटेजमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित एसटी बसच्या वाहकाकडे चौकशी केली. यावेळी स्मिता माने यांनी संबंधित बसमधून प्रवास केल्याचे वाहकाने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे त्या बीडवाडी परिसरात कशा पोहोचल्या, याबाबत तपासाला दिशा मिळाली आहे.
स्मिता माने यांचा मृतदेह आढळला, त्यावेळी त्यांच्या खिशात ४७० रुपये मिळाले होते. त्या घरातून बाहेर पडताना जवळपास ५०० रुपये घेऊन निघाल्या असाव्यात आणि एसटीचे तिकीट काढल्यानंतर उर्वरित रक्कम त्यांच्या खिशात राहिली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, केवळ या बाबींवरून मृत्यूचे कारण निश्चित होत नाही.
स्मिता माने या एसटीने एकट्याच बीडवाडी परिसरात गेल्याचे सीसीटीव्ही फुटेज आणि वाहकाच्या चौकशीतून समोर आल्यामुळे तपासात आत्महत्येची शक्यता विचारात घेतली जात असल्याची माहिती आहे. मात्र, या मिळालेल्या माहितीच्या आधारे घातपाताची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. स्मिता माने यांच्या मृत्यूचे नेमके कारण निश्चित करण्यासाठी शवविच्छेदन अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे. हा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूमागील वस्तुस्थिती स्पष्ट होणार असेही पोलिसांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांचा पुढील तपास आणि वैद्यकीय अहवाल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.













