काटवली येथे बंधाऱ्यात मासेमारी करताना प्रौढाचा बुडून मृत्यू

देवरुख (प्रतिनिधी) :

संगमेश्वर तालुक्यातील काटवली येथे नदीपात्रातील बंधाऱ्यावर मासे पकडण्यासाठी गेलेल्या एका ५४ वर्षीय व्यक्तीचा पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने खोल डोहात बुडून जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. प्रकाश अर्जुन गेल्ये (वय ५४ वर्षे, रा. काटवली, ता. संगमेश्वर) असे मृत व्यक्तीचे नाव असून, या अनपेक्षित दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण काटवली गावावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या वृत्तानुसार, प्रकाश गेल्ये हे नेहमीप्रमाणे गावातील नदीवर बांधलेल्या बंधाऱ्याजवळ मासेमारी करण्यासाठी गेले होते. मात्र, त्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह आणि खोलीचा अचूक अंदाज न आल्यामुळे त्यांचा तोल गेला आणि ते पाण्याच्या खोल प्रवाहात ओढले गेले. स्वतःला सावरून बाहेर पडण्याची संधी न मिळाल्याने त्यांचा पाण्यात बुडून गुदमरून मृत्यू झाला. घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने बंधाऱ्याकडे धाव घेतली आणि शोधमोहीम राबवून त्यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. या घटनेची नोंद स्थानिक पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस पुढील कायदेशीर तपास करत आहेत. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, नदीपात्र अथवा बंधाऱ्यांच्या परिसरात मासेमारीसाठी जाणाऱ्या नागरिकांनी पाण्याच्या पातळीचा आणि खोलीचा अंदाज घेऊन स्वतःच्या सुरक्षेची पूर्ण खबरदारी बाळगावी, असे आवाहन ग्रामस्थ व पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.