डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू असताना घेतला अखेरचा श्वास
मंडणगड प्रतिनिधी : कुंबळे पाटीलवाडी येथील विनोद महादेव गायकवाड (वय ५९) यांचा डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची नोंद मुंबई येथील जे.जे. मार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या संदर्भात मयताचा मुलगा विजय गायकवाड याने पोलीसांकडे अकस्मिक मृत्युची नोंद केली आहे पोलीसांकडुन
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, विनोद महादेव गायकवाड हे १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास कुंबळे बसस्थानकाजवळ फिरत असताना त्यांच्या डोक्यावर दगड आदळला. यामुळे ते खाली पडले आणि त्यांच्या डोक्यातून रक्तस्राव होऊ लागला.घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने कुंबळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. पुढील उपचारांसाठी त्यांना मंडणगड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डोक्यातून रक्तस्राव सुरू असल्याने डॉक्टरांनी त्यांना सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला. मंडणगड येथे सीटी स्कॅनची सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना माणगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे सीटी स्कॅन केल्यानंतर त्यांच्या डोक्यात रक्ताची गाठ झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना मुंबईतील भायखळा येथील सर जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सर जे.जे. मार्ग पोलीस ठाण्यात त्यांच्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, संबंधित कागदपत्रे मंडणगड पोलीस ठाण्यात प्राप्त झाली आहेत.













