चिपळूण नगरपरिषदेच्या मालकीच्या जागेच्या ताब्याबाबत चौकशीचे आदेश

भारत पेट्रोलियमच्या मेहता पेट्रोल पंपाला भाडेतत्त्वावर दिलेल्या जागेप्रकरणी जिल्हा प्रशासनाची नगरपरिषदेला सूचना
 इनायत मुकादम यांच्या तक्रारीची दखल

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण नगरपरिषदेच्या मालकीच्या जागेवर भारत पेट्रोलियम कंपनीच्या (लक्ष्मी ट्रेडर्स) मेहता पेट्रोल पंपाला भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या जागेच्या ताब्याबाबत जिल्हा प्रशासनाने दखल घेतली आहे. या प्रकरणी प्राथमिक चौकशी करून वस्तुस्थितीदर्शक सविस्तर अहवाल आवश्यक कागदपत्रांसह सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चिपळूण नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
चिपळूण येथील पेठमाप परिसरातील रहिवासी इनायत इब्राहिम मुकादम यांनी १ ऑक्टोबर २०२६ रोजी ई-मेलद्वारे या प्रकरणासंदर्भात तक्रार अर्ज सादर केला होता. या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा सह आयुक्त, नगरपरिषद प्रशासन विभागाचे वैभव गारवे यांनी चिपळूण नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र पाठवून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पत्रात नमूद केल्यानुसार, चिपळूण नगरपरिषदेच्या मालकीच्या जागेवर भारत पेट्रोलियम कंपनीच्या (लक्ष्मी ट्रेडर्स) मेहता पेट्रोल पंपाला भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या सिटी सर्व्हे क्रमांक २६५६ या जागेच्या ताब्याबाबत तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीची प्राथमिक चौकशी करून अर्जदाराला त्याबाबत कळविण्याबरोबरच पूर्तता अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच, प्राथमिक चौकशीतून या प्रकरणात पुढील कार्यवाही आवश्यक असल्याचे स्पष्ट झाल्यास, नगरपरिषदेने आपले स्वयंस्पष्ट अभिप्राय नोंदवून वस्तुस्थितीदर्शक, मुद्देनिहाय आणि सविस्तर अहवाल आवश्यक कागदपत्रांसह जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावा, असेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणात नगरपरिषद प्रशासनाकडून होणाऱ्या चौकशीत नेमकी काय वस्तुस्थिती समोर येते आणि संबंधित जागेच्या ताब्याबाबत कोणती कार्यवाही केली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.