अंध दिव्यांग विलासच्या आयुष्यात घरकुलाने आणला प्रकाश!

 चार वर्षांच्या प्रयत्नांना यश; दसऱ्याच्या मुहूर्तावर ८० वर्षीय आईसह नव्या घरात प्रवेश

चिपळूण (प्रतिनिधी) : डोळ्यांसमोर अंधार असला, तरी जगण्याची उमेद हरवलेली नाही… डोक्यावर हक्काचे छप्पर नसताना ८० वर्षांच्या आईसोबत झोपडीवजा घरात दिवस काढणाऱ्या अंध दिव्यांग विलास रामचंद्र बने यांच्या आयुष्यात अखेर आनंदाचा क्षण आला. आईचे कष्ट, मुलाची अगतिकता आणि हक्काच्या घराचे स्वप्न यांची सांगड घालत आई सुकाई देवी ग्रामविकास संघटनेने चार वर्षे सातत्याने पाठपुरावा केला. या प्रयत्नांना यश आले आणि दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर विलास व त्यांच्या आईने नव्या घरात साधेपणाने गृहप्रवेश केला.
या घराने केवळ त्यांना निवारा दिला नाही, तर त्यांच्या आयुष्यात सुरक्षिततेची नवी आशाही निर्माण केली. मौजे असुर्डे येथील विलास बने हे अंध दिव्यांग असून, ते आपल्या वृद्ध आईसोबत झोपडीवजा घरात राहत होते. वयाची ऐंशी वर्षे पार केलेल्या आईला मुलाच्या भविष्याची चिंता होती, तर विलास यांच्यासमोरही रोजच्या जगण्याचे अनेक प्रश्न होते. या परिस्थितीची जाणीव ठेवून आई सुकाई देवी ग्रामविकास संघटनेचे अध्यक्ष सुधीर सावर्डेकर, उपाध्यक्ष अजित खापरे, सचिव समीर चोगले आणि निलेश खापरे यांनी विलास यांना हक्काचे घर मिळावे, यासाठी चार वर्षे प्रयत्न केले. मंजूर निधीतून घराचे बांधकाम पूर्ण करणे हे मोठे आव्हान होते. अशा वेळी संघटनेचे सचिव समीर चोगले यांनी माणुसकीचे दर्शन घडविले. ते स्वतः बांधकाम क्षेत्रातील कुशल कारागीर असून घरे, बंगले आणि शासकीय इमारतींच्या बांधकामाची कामे करतात. व्यावसायिक कामांमध्ये व्यस्त असतानाही त्यांनी विलास यांच्या घरकुलासाठी कोणतीही मजुरी न घेता बांधकाम करून दिले. पावसाळ्यापूर्वी घर पूर्ण करून देत त्यांनी या कुटुंबाला मोठा आधार दिला. या कामासाठी असुर्डे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक भागवत आणि सरपंच पंकज साळवी यांनी सहकार्य केले. पंचायत समितीमधून घरकुलाचे हप्ते तातडीने मिळावेत, यासाठी नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य उज्ज्वला घाग यांनी प्रयत्न केले. महसूल विभागाकडून मोफत वाळू मिळवून देण्यासाठी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य संजय कदम यांनी मोलाची भूमिका बजावली. तसेच खेरशेतचे सरपंच नागेश साळवी यांनी वाळू वाहतुकीची व्यवस्था करून दिली. दसऱ्याच्या मुहूर्तावर या घराचा साधेपणाने गृहप्रवेश करण्यात आला. या आनंदाच्या क्षणी आई सुकाई देवी ग्रामविकास संघटनेच्या वतीने विलास आणि त्यांच्या आईला जीवनावश्यक वस्तू, कपडे तसेच घरात वीजमीटर नसल्याने सौरदिव्यांचे संच भेट देण्यात आले. त्यामुळे नव्या घरातील अंधार दूर करण्यासाठीही संघटनेने पुढाकार घेतला.
मदतीचा हात अजूनही कायम
घर मिळाले असले, तरी या कुटुंबाच्या अडचणी पूर्णपणे संपलेल्या नाहीत. विलास आणि त्यांच्या आईला निराधार पेन्शन योजना सुरू करून देणे, अंत्योदय रेशनकार्डाचा लाभ मिळवून देणे आणि घराला वीजमीटर बसवून देणे यासाठी संघटना पुढील काळातही प्रयत्नशील राहणार आहे. शासकीय योजनांचा लाभ, लोकप्रतिनिधींचे सहकार्य आणि एका बांधकाम कारागिराने मजुरी न घेता केलेली सेवा यांची सांगड घातल्यास एखाद्या गरजू कुटुंबाच्या आयुष्यात किती मोठा बदल घडू शकतो, याचे उदाहरण विलास बने यांच्या घरकुलाने घालून दिले आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर मिळालेले हे घर विलास आणि त्यांच्या वृद्ध आईसाठी केवळ चार भिंतींचा निवारा नसून, जगण्याला नवी उमेद देणारे माणुसकीचे घर ठरले आहे.