देवरूख कनिष्ठ महाविद्यालयात फॅन्सी ड्रेस व गरबा नृत्य स्पर्धा उत्साहात संपन्न

देवरूख (प्रतिनिधी):

देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागामार्फत नवरात्रोत्सवानिमित्त फॅन्सी ड्रेस व गरबा नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गरबा नृत्य स्पर्धेत एकूण सात गटांनी सहभाग घेतला. सरस्वती पूजनाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.

कार्यक्रमाच्या आरंभी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनी नवरात्रोत्सवाचे शास्त्रीय महत्त्व विशद केले. नवरात्रीचा सण आरोग्याच्या दृष्टीने कसा महत्त्वाचा आहे, तसेच या काळातील परंपरा आणि त्यामागील शास्त्रीय दृष्टिकोन याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. प्रा. सीमा शेट्ये यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी नवरात्रोत्सव हा स्त्रीशक्तीचा जागर असल्याचे सांगितले. तसेच या सणाचे कृषिसंस्कृतीशी असलेले नाते स्पष्ट करून, भारतीय परंपरेतील त्याचे महत्त्व विशद केले. स्त्रीशक्तीचा गौरव करणाऱ्या या उत्सवातून विद्यार्थ्यांनी स्त्रियांचा आदर करावा, त्यांना समानतेची वागणूक द्यावी आणि समाजात स्त्री-सन्मानाची भावना रुजवावी, असे आवाहन प्रा. सौ. शेट्ये यांनी याप्रसंगी केले.

विद्यार्थ्यांनी आकर्षक वेशभूषा आणि उत्साहपूर्ण गरबा नृत्याच्या माध्यमातून आपले कलागुण सादर केले. या स्पर्धेचे परीक्षण प्रा. धनंजय दळवी व प्रा. पूनम भोपळकर-जाधव यांनी केले.
स्पर्धेमध्ये खालील विद्यार्थ्यांच्या समूहाने यश प्राप्त केले.
प्रथम क्रमांक: सायली पांचाळ व सहकारी(१२वी बँकिंग).
द्वितीय क्रमांक: सायली गुरव व सहकारी(१२वी वाणिज्य).
तृतीय क्रमांक:सृष्टी सावंत व सहकारी(११वी संयुक्त).
उत्तेजनार्थ क्रमांक: भक्ती धुमक व सहकारी(१२वी संयुक्त).

उत्कृष्ट नृत्य सादरीकरण सृष्टी सावंत(११वी संयुक्त- वाणिज्य), सायली पांचाळ(१२वी बँकिंग), तनिष्का गावडे(१२वी वाणिज्य) या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. स्पर्धा संपन्न झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना एकत्रितपणे गरबा खेळण्याची संधी देण्यात आली. त्यामुळे महाविद्यालयाच्या परिसरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देतानाच भारतीय संस्कृती, परंपरा, स्त्री-सन्मान आणि आरोग्यविषयक जाणीव यांचे महत्त्व अधोरेखित करणारा हा उपक्रम उत्साहात संपन्न झाला.