खेरशेत येथे अशोका विजयादशमी कार्यक्रमात प्रतिपादन
चिपळूण (प्रतिनिधी) : तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म विज्ञाननिष्ठ असून यात मानवाचे कल्याण सामावले आहे. सुखकर जीवन जगण्यासाठी धम्माचे आचरण गरजेचे असल्याचे प्रतिपादन चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समितीच्या सावर्डे विभागाचे अध्यक्ष काशिराम कदम गुरुजी यांनी केले. संस्थेच्या खेरशेत शाखेच्यावतीने खेरशेत येथील तक्षशिला बुद्ध विहारात अशोका विजयादशमी कार्यक्रम धम्ममय वातावरणात उत्साहात साजरा झाला. यावेळी प्रमुख मार्गदर्शनात काशिराम कदम गुरुजी बोलत होते.
यावेळी त्यांनी धम्माचे महत्व विषद केले. प्रारंभी शाखेचे सचिव संजय कदम यांनी प्रास्ताविक केले. काशिराम कदम गुरुजी यांच्याहस्ते धम्म ध्वजारोहण करण्यात आले. माजी अध्यक्ष सुनिल कदम यांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. महिला संघटनेच्या अध्यक्षा शैला कदम यांच्या हस्ते माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. बुध्दपूजापाठ घेण्यात आला.
बुद्धांनी दिलेल्या धम्म मार्गात सर्वांगीण विकास सामावलेला आहे. बुद्ध नीतीनेच मानवाचे कल्याण साधता येईल, असे विचार शाखेचे माजी सचिव मिलिंद कदम यांनी यावेळी मांडले. पदवीधर प्राथमिक शिक्षक अनंत कदम यांनी महापुरुषांच्या विचारांचे आचरण गरजेचे असल्याचे सांगितले. मोबाईलचा अतिवापर टाळण्याचा सल्लाही त्यांनी दिला. पदवीधर प्राथमिक शिक्षक प्रदीप कदम यांनी चांगले शिक्षण घेऊन प्रयत्नवादी बना, असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. शाखेचे माजी अध्यक्ष सुनिल कदम यांनी आपापसातील मतभेद विसरून संस्थेच्या विधायक कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. प्राथमिक शिक्षिका प्रबोधिनी कदम यांनी संस्थेच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल कौतुक केले.
यावेळी शाखेचे उपाध्यक्ष विनोद कदम, धर्मदास कदम, राजाराम कासारे, राहुल कदम, अनिल कदम, ज्येष्ठ पदाधिकारी सुधाकर कदम, संघमित्रा कदम, प्रज्ञा कदम, मनाली कदम, युवा नेते मनोज उर्फ पप्पू कदम, हर्ष कदम, राजू कासारे, प्राथमिक शिक्षिका साक्षी कदम, रमेश कदम, स्वप्निल कदम, नितीन कदम, स्वराज मोहिते, आ. शेखर निकम यांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र कदम, रोशन कदम, वैभव कदम, तेजस कदम यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी यशोधरा महिला मंडळ तसेच सम्यक युवा मंच यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.













