कणकवलीत ७ नोव्हेंबरला सुदर्शन मित्रमंडळाची नरकासुर स्पर्धा

प्रथम क्रमांकासाठी २० हजारांचे पारितोषिक; सर्व सहभागी स्पर्धकांना चषक

कणकवली : सुदर्शन मित्रमंडळाच्या वतीने शनिवार, दि. ७ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला २० हजार रुपये व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांकासाठी १३ हजार रुपये व चषक, तर तृतीय क्रमांकासाठी ८ हजार रुपये व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.

चौथ्या क्रमांकाच्या स्पर्धकाला २ हजार ५०० रुपये व चषक देण्यात येणार असून, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला ५०० रुपये व आकर्षक चषक देऊन प्रोत्साहित करण्यात येणार आहे.

नरकासुराची कलाकृती अधिक आकर्षक आणि नावीन्यपूर्ण व्हावी, या उद्देशाने स्पर्धकांनी विविध तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. नरकासुर साकारताना ईकोफ्रेंडली असण्याचे कोणतेही बंधन नसल्याचेही आयोजकांनी स्पष्ट केले आहे. पारंपरिक कलेसोबत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत आपल्या कल्पकतेतून वेगळ्या कलाकृती सादर करण्याची संधी या स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धकांना मिळणार आहे.

या स्पर्धेच्या ठिकाणी नरकासुर वधाचे कलाकृती सादरीकरणही करण्यात येणार आहे. डी. पी. रोड, अन्नपूर्णा बेकरीच्या जवळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवून आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करावे, असे आवाहन सुदर्शन मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी वैभव आरोळकर (७२१९८९९९६६), बाळा डिचोलकर, चेतन फोंडेकर, यश हर्णे, संकेत हर्णे, नितीन कुवळेकर आणि प्रवीण सांबड यांच्याशी संपर्क साधावा.