चार-पाच छोट्या नौकांच्या सहाय्याने ट्रॉलरला घेराव घालून मासळी पळविल्याचा आरोप; देवगड पोलिसांना निवेदन
देवगड : प्रतिनिधी
देवगड ते वेंगुर्ला या सागरी हद्दीत मासेमारी करणाऱ्या ट्रॉलर नौकांमधील मासळीची काही छोट्या नौकाधारकांकडून संघटितपणे लूट केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकाराचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी ट्रॉलर मच्छीमारांच्या शिष्टमंडळाने देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
देवगड ते वेंगुर्ला या सागरी किनारपट्टीच्या हद्दीत ट्रॉलर मच्छीमार आपल्या नियोजित क्षेत्रात मासेमारी करत असताना चार ते पाच छोट्या नौका एकत्र येऊन ट्रॉलरला घेराव घालतात. त्यानंतर ट्रॉलरमधील मासळी लुटून नेली जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या छोट्या नौकांवर नाव किंवा नोंदणी क्रमांक नसल्याने त्यांची ओळख पटविणे कठीण होत आहे. यापूर्वी ट्रॉलर मच्छीमारांकडून तक्रारी केल्या जात नसल्याने अशा प्रकारांमध्ये गेल्या काही दिवसांत वाढ झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
या कथित लुटीमुळे ट्रॉलर मच्छीमारांचे आर्थिक नुकसान होत असून, मासेमारीच्या जाळ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित नौकांचा शोध घ्यावा आणि मासळीची लूट करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनात कथित लुटीमध्ये सहभागी असल्याचा आरोप असलेल्या १३ जणांची नावे देण्यात आली आहेत. तसेच लुटून नेलेली मासळी खरेदी करणाऱ्या मालवण येथील पाच खरेदीदारांची नावेही पोलिसांना सादर करण्यात आली आहेत.
या संदर्भात सहदेव बापर्डेकर, द्विजकांत कोयंडे, निवृत्ती तारी, गोपीनाथ तांडेल, इतियास होलसेकर, अशोक सारंग, अनिस कोयंडे, प्रणव पारकर आणि रिहान शेख यांच्या शिष्टमंडळाने देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांची भेट घेतली. या वेळी संबंधित प्रकाराबाबत चर्चा करून निवेदन सादर करण्यात आले. या प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलिसांनी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे.













