राजापुरात घडफोडयांचे सत्र सुरूच: ओणी कोंडिवळे येथे घरफोडी

सोन्या-चांदीचे सुमारे १ लाख ८ हजारांच्या दागिन्यांवर चोरटयांचा डल्ला

राजापूर प्रतिनिधी : राजापूर तालुक्यात घरफोडींचे सत्र सुरूच असून खरवते, पाचल नंतर आता ओणी कोंडिवळे येथील गोतावडे वाडीमध्ये घरफोडी करून अज्ञात चोरटयांनी सोन्या-चांदीचे दागिने लांबविले आहते. मंगळवारी २० ऑक्टोबर २०२६ रोजी ही घटना घडली आहे.
ओणी कोंडिवळे गोतावडे वाडी येथील शामसुंदर गजानन शेट्ये यांच्या राहत्या घरात झालेल्या या चोरीत अज्ञात चोरट्याने एकूण १ लाख ८ हजार ७६५ रुपये किमतीचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.४५ ते रात्री ९.४५ या कालावधीत शेट्ये यांच्या घरात कोणीही नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घराच्या मागील दरवाजाची कडी तोडून तसेच दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले.
चोरीस गेलेल्या ऐवजात ८७ हजार ७६५ रुपये किमतीचे १२.८५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि २१ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने यांचा समावेश आहे. एकूण १ लाख ८ हजार ७६५ रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २७०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३०५(अ), ३३१(३) आणि ३३१(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घरफोडीप्रकरणी पुढील तपास राजापूर पोलीस करीत आहेत.
राजापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांत वारंवार घरफोडीच्या घटना घडत असून जनतेमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आजपर्यंत झालेल्या घरफोडयांचा तपास लावण्यात पोलीसांना यश आलेले नाही. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात जनतेमध्ये काहीसे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.