दिवाळी खरेदीसाठी महिलांच्या वस्तूंची पर्वणी; इंद्रप्रस्थ हॉलमध्ये आयोजन
देवगड : प्रतिनिधी
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना विविध वस्तूंची खरेदी एकाच ठिकाणी करता यावी, तसेच महिला उद्योजिकांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने देवगड तालुका महिला व्यापारी संघातर्फे ‘आदिशक्ती’ प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन २४ व २५ ऑक्टोबर रोजी देवगड येथील इंद्रप्रस्थ हॉलमध्ये भरविण्यात येणार आहे.
या प्रदर्शनात दिवाळीच्या सजावटीच्या वस्तू, आकर्षक आकाशकंदील, विविध प्रकारच्या साड्या व कपडे, दागिने, महिलांच्या पर्स, दिवाळीचे फराळाचे पदार्थ, केक, चॉकलेट्स, कोकणी खाद्यपदार्थ, लोणची, आवळा कँडी तसेच विविध प्रकारच्या आकर्षक पणत्या आणि रांगोळी साहित्य अशा अनेक वस्तू खरेदीसाठी उपलब्ध असणार आहेत.
दिवाळीच्या खरेदीचा आनंद घेतानाच स्थानिक महिला उद्योजिकांनी तयार केलेल्या वस्तूंना प्रोत्साहन देण्याची संधी या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्राहकांना मिळणार आहे. ‘खरेदी तुमची… भरारी तिची!’ या संदेशातून महिलांच्या व्यवसायाला आणि स्वावलंबनाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
हे प्रदर्शन दोन्ही दिवशी सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. देवगड आणि परिसरातील नागरिकांनी कुटुंबासह या प्रदर्शनाला भेट देऊन दिवाळीची खरेदी करावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.













