सावंतवाडी । प्रतिनिधी : सामंत ट्रस्ट, मुंबई यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरजू रुग्ण आणि होतकरू विद्यार्थ्यांना डॉ. भाऊसाहेब परुळेकर नर्सिंग होम येथे डॉ. जयेंद्र परुळेकर आणि ज्येष्ठ पत्रकार सिताराम गावडे यांच्या हस्ते प्रत्येकी दहा हजार रुपयांच्या धनादेशांचे वाटप करण्यात आले.
सध्या सर्वत्र महागाईचा भडका उडालेला असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये दुष्काळाचे सावट पसरले आहे. अशा बिकट परिस्थितीत वैद्यकीय औषधोपचार करणे सामान्य नागरिकांना आर्थिक अडचणींमुळे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर ‘फुल ना फुलाची पाकळी’ या तत्त्वावर सामंत ट्रस्टकडून वारंवार मिळणारी ही आर्थिक मदत अनेक गरजूंसाठी मोठा दिलासा ठरणारी ठरली आहे.
या कार्यक्रमात मातोंड येथील परशुराम धुरी यांना डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी, ओटवणे येथील रामकृष्ण गावकर यांना रक्तदाब व शस्त्रक्रियेसाठी, तळवडे येथील तानाजी कुंभार यांना बायपास शस्त्रक्रियेसाठी, ओटवणे येथील रॉकी माडतीस यांना हृदयरोगावरील उपचारांसाठी, बिरोडकर टेंब सावंतवाडी येथील भिकाजी बिरोडकर यांना मधुमेह व रक्तदाबाच्या उपचारांसाठी आणि वेर्ले येथील द्रौपदी कदम यांना मणक्यांच्या आजारावरील उपचारासाठी अशा सहा रुग्णांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत सुपूर्द करण्यात आली.
तसेच वैद्यकीय मदतीसोबतच गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी हातभार म्हणून माणगाव येथील दिव्या मेस्त्री, मातोंड येथील सचिन नाईक, गोवा येथील नितीन फडके, मातोंड येथील पूजा राऊत, शिरोडा येथील सुधीर पवार आणि न्हावेली येथील ज्ञानेश नाईक या सहा विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले.
या उपक्रमाबद्दल सर्व लाभार्थी व त्यांच्या नातेवाईकांनी मुंबई येथील कै. दिनकर गंगाराम सामंत ट्रस्टचे विश्वस्त जयप्रकाश आडेलकर, सौ. रत्नाताई आडेलकर, ॲड. सुनील सामंत, तिर्थराज उर्फ बाळासाहेब सामंत आणि अमितदादा आडेलकर यांचे मनापासून आभार मानले आहेत.













