जलसंवर्धनाचा दिला प्रेरणादायी संदेश
सावंतवाडी :भविष्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी पाण्याचे महत्त्व ओळखून ते अडवणे आणि जलसाठा वाढवणे ही काळाची गरज बनली आहे. याच पार्श्वभूमीवर निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूलच्या स्काऊट-गाईड पथकातील विद्यार्थ्यांनी वनराई बंधारा अभियानाअंतर्गत प्रत्यक्ष बंधारा बांधून जलसंवर्धनाचा अनमोल संदेश दिला आहे. विद्यार्थ्यांनी केवळ विचारांवर न थांबता प्रत्यक्ष कृतीतून ही जनजागृती घडवून आणली आहे.
पाण्याची बचत आणि जलसंधारण या माध्यमातून भविष्यातील पाणीटंचाईवर यशस्वीरीत्या मात करता येऊ शकते, हा महत्त्वपूर्ण विचार या उपक्रमाच्या माध्यमातून समाजासमोर मांडण्यात आला. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये केवळ अभ्यासापुरती मर्यादित न राहता श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण होण्यास मोठी मदत होते. शालेय शिक्षणासोबतच सामाजिक व पर्यावरणविषयक जबाबदारीचे भान जपणारा हा उपक्रम संपूर्ण परिसरात अत्यंत प्रेरणादायी ठरत असून, ग्रामस्थांकडून विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
या स्तुत्य उपक्रमात निरवडे गावच्या सरपंच श्रीमती सुहानी गावडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थित राहून सहभाग नोंदवला. तसेच संस्कार नॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रणाली रेडकर, समन्वयक श्री अजय बांदेकर, सहाय्यक शिक्षक मनीष सावंत, योगेश येरम, साईश तारी यांच्यासह स्काऊट-गाईडच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त आणि सक्रिय सहभाग घेऊन बंधारा बांधण्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण केले.













