ऑनलाइन ट्रांजेक्शनवरून लागला आरोपीचा तपास
सावंतवाडी: माडखोल धवडकी येथून मध्यरात्री घराबाहेरून चोरलेली तीन आसनी रिक्षा सावंतवाडी पोलिसांनी अवघ्या काही तासांत इचलकरंजी येथून हस्तगत करत दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. महम्मदरफीक सलीम मुल्ला (वय ३९) आणि संजय भुपाल पोवार (वय २५, दोन्ही रा. इचलकरंजी, खोतवाडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, याबाबत अधिक माहिती अशी की धवडकी येथील गणपत मोहनशेट कोरगावकर (वय ४६) यांची (MH-07 S-5480 ) क्रमांकाची रिक्षा त्यांनी नेहमीप्रमाणे मंगळवार १५ जुलै रोजी रात्री घराबाहेर पार्किंग केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्यांना रिक्षा जागेवर दिसली नाही. त्यानंतर त्यांनी तात्काळ सावंतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत रिक्षा चोरीची तक्रार दाखल केली.
याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १३३/२०२५, बी.एन.एस. कलम-३०५ (ब) प्रमाणे अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अज्ञात आरोपींनी १६ जुलै रोजी पहाटे १ ते ६ वाजेच्या सुमारास ही रिक्षा चोरल्याचे निष्पन्न झाले.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत, पोलीस अधीक्षक मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक नाओमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे अंमलदार दीपक शिंदे, मनीष शिंदे, लक्ष्मण काळे, राजेश नाईक, संतोष गलोले यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली.
सीडीआर, सीसीटीव्ही फुटेज आणि बँक स्टेटमेंट यांसारख्या तांत्रिक बाबींचा कसून तपास करण्यात आला. तपासादरम्यान,
सदरची रिक्षा इचलकरंजी येथे असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलीस अंमलदार दीपक शिंदे व मनीष शिंदे यांनी घटनास्थळी जात संशयतांसह रिक्षा हस्तगत केली.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार संतोष गलोले करत आहेत. पोलिसांनी केलेल्या या जलद कारवाईमुळे रिक्षामालकाला दिलासा मिळाला आहे.












