गेल्या दोन महिन्यात ट्रक ,कंटेनर यांचे दहा ते बारा अपघात
संतोष कोत्रे
लांजा (प्रतिनिधी ) मुंबई गोवा महामार्गावर ‘ब्लॅक पॉईंट’ म्हणून ओळख असलेल्या आंजणारी घाटातील तीव्र उताराच्या ठिकाणी आज शुक्रवारी गतिरोधक बसवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे उशिरा का होईना राष्ट्रीय महामार्ग विभागाला यामुळे जाग आली
आहे.
आंजणारी घाटातील सातत्याने होणाऱ्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर वर्तमानपत्रांनी हा विषय लावून धरला होता. तर गेल्या आठवड्यात या ठिकाणी तीन ते चार अपघात झाले होते. त्यामुळे हा विषय प्रकर्षाने ऐरणीवर आला होता. तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.
मुंबई गोवा महामार्गावर लांजा तालुक्याच्या हद्दीत वेरळ आणि आंजणारी घाट हा तीव्र वळणाचा आणि धोकादायक क्षेत्र म्हणून ओळखला जातो. अपघात प्रवण क्षेत्र म्हणून हा भाग कूप्रसिद्ध आहे. आजवर या ठिकाणी शेकडो अपघात झालेले आहेत. त्यामध्ये कित्येक जण जखमी झाले असून अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहेत. आंजणारी
घाटातील तीव्र उतार हा नेहमीच वाहन चालकांसाठी आणि विशेषता अवजड वाहनांसाठी मृत्यूची टांगती तलवार बनून राहिलेला आहे. उताराच्या ठिकाणी वाहनांचे ब्रेक फेल होतात आणि त्यानंतर ही अवजड वाहने महामार्गालागाच्या डोंगरावर आपटून पलटी होतात. या ठिकाणी वारंवार अपघात होत असताना देखील त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महामार्ग ठेकेदार कंपनी यांची डोळेझाक होते आहे का असा प्रश्न यामुळे निर्माण झाला होता .
अशा प्रकारे आंजणारी घाटातील उताराच्या ठिकाणी सातत्याने अपघात होत आहेत. मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरी करणाचे काम सुरु झाल्यानंतर तीव्र उताराच ठिकाणी अपघात रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून ठोस उपाययोजना केली जाईल अशी अपेक्षा होती. मात्र या ठिकाणी वाहनांची गती रोखण्यासाठी केवळ बॅरल उभे करण्यापलीकडे कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली नव्हती.
आंजणारी घाटात अपघात झाल्यानंतर ट्रक, कंटेनर यासारखी वाहने महामार्गा लगत पलटी होतात. तर काही वाहने डोंगरावर जाऊन धडकतात. या ठिकाणी महामार्ग लगत लोकवस्ती आहे. भविष्यात ब्रेक निकामी होऊन एखादे अवजड वाहन महामार्ग लगतच्या या घरांमध्ये, लोकवस्ती मध्ये घुसले तर फार मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे घडल्यास त्याला जबाबदार कोण? राष्ट्रीय महामार्ग विभाग याची जबाबदारी घेणार का? असा संतप्त सवाल येथील नागरिकांतून व्यक्त होत होता
दरम्यान महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासी, वाहन चालक यांच्या जीविताच्या दृष्टीने, त्यांचा प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग विभाग आंजणारी घाटातील अपघात टाळण्यासाठी ठोस उपाय योजना राबवणार का? असाही प्रश्न उपस्थित केला होता
या साऱ्या पार्श्वभूमीवर अंजनारी घाट परिसरात अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अखेर प्रशासनाकडून गतिरोधक (स्पीड ब्रेकर) उभारणीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे.













