आचरा l प्रतिनिधी :वायंगणी-पाटवाडी येथे कामादरम्यान विजेचा धक्का लागून कंत्राटी कामगार राजेश गोपाळ पाटणकर (वय ३२, रा. चिंदर, गावठणवाडी) गंभीर जखमी झाल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद आज आचरा येथे उमटले. या दुर्घटनेची जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवाल उपस्थित करत भाजप पदाधिकारी आणि चिंदर, वायंगणी परिसरातील ग्रामस्थांनी आचरा वीज वितरण कार्यालयावर धडक दिली. जखमी कामगाराच्या उपचारांसाठी तातडीने आर्थिक मदत द्यावी, अपघाताची जबाबदारी निश्चित करावी, अशी आक्रमक मागणी करत कार्यालयात सुमारे दोन तास घेराव घालण्यात आला. येत्या काळात मागण्या मान्य न झाल्यास वीज वितरणविरोधात फौजदारी तक्रार दाखल करून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. आंदोलनाची माहिती मिळताच आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कतविले दाखल झाले होते.
काल सायंकाळी वायंगणी-पाटवाडी येथे विद्युत खांबावर डीपीचे काम करत असताना राजेश पाटणकर यांना विजेचा जोरदार धक्का बसला होता. या दुर्घटनेत ते गंभीर जखमी झाले. त्यांना प्रथम आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी कणकवली येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेनंतर शुक्रवारी ग्रामस्थ आणि भाजप तसेच शिवसेना पदाधिकाऱ्यांनी वीज वितरण कार्यालयात धडक देत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी कंत्राटी कामगार संघटना जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, भाजप तालुका धोंडी चिंदरकर, भाजप आचरा प्रभारी संतोष गांवकर, पंचायत समिती सदस्य दिपक सर्वे, महेश वरक, देवेंद्र हडकर, एकनाथ पवार, शाहुलखन बांदिवडेकर, विनोद लब्दे, गणेश पाटणकर, , विनायक मसुरकर, विराज सावंत, संतोष अपराज, सागर अपराज, बाळू वस्त, रविंद्र घागरे, अरुण माने, शंकर गांवकर, संजय लोके, ठेकेदार गोवेकर, सागर परब, गिरीश पवार, सचिन जाधव, अमोल घाडी, आशिष तोंडवळकर उपस्थित होते.
अपघाताची जबाबदारी निश्चित करण्याच्या मुद्द्यावरून आंदोलनादरम्यान वातावरण चांगलेच तापले. भाजप आचरा प्रभारी संतोष गांवकर यांनी, जोपर्यंत वीज वितरण विभाग या घटनेची जबाबदारी स्वीकारत नाही, तोपर्यंत कार्यालयातून हलणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. यावेळी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी या घटनेस ठेकेदार जबाबदार असल्याचे सांगितल्याने उपस्थित ग्रामस्थ अधिकच आक्रमक झाले. जबाबदारी ढकलण्याऐवजी जखमी कामगाराला न्याय मिळवून देण्याची भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी संबंधित ठेकेदार गोवेकर यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. जखमी राजेश पाटणकर हा आपला कामगार असून, तो पूर्णपणे बरा होईपर्यंत त्याच्या उपचारांची जबाबदारी आपण घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, अपघाताची जबाबदारी आपली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वीज वितरण विभागाकडून कामासाठी बोलावण्यात आले होते. विद्युत पुरवठा बंद करण्यात आला असून काम सुरू करण्यास हरकत नसल्याचे सांगण्यात आल्यानंतरच कामाला सुरुवात केली. वीजपुरवठा बंद असल्याचे सांगितल्यामुळेच कामगार खांबावर चढला; मात्र काम करत असताना त्याला विजेचा धक्का बसून तो खाली पडला, असे ठेकेदाराने सांगितले. विद्युत पुरवठा सुरू किंवा बंद करण्याची जबाबदारी वीज वितरण विभागाची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ठेकेदाराच्या या भूमिकेनंतर ग्रामस्थांनी पुन्हा वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत अपघाताच्या नेमक्या कारणाची चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली.
या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, उपाध्यक्ष महेश राणे, आचरा जिल्हा परिषद सदस्य वर्षा सांबारी, वायंगणी सरपंच रुपेश पाटकर, आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस, आचरा उपसरपंच संतोष मिराशी, शिवसेना आचरा विभागप्रमुख संतोष कोदे, मनोज हडकर, भाऊ हडकर, बाबू परुळेकर, अभय भोसले, चंदू सावंत आदी सहभागी झाले होते. त्यांनीही वीज वितरण विभागाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करत घटनेची चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली.
गंभीर जखमी राजेश पाटणकर यांच्या प्रकृतीबाबत ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली. जखमी कामगाराच्या उपचारांसाठी तातडीने आर्थिक मदत द्यावी, अपघाताची जबाबदारी निश्चित करावी आणि संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, या मागण्यांवर ग्रामस्थ ठाम राहिले. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास वीज वितरण विभागाविरोधात फौजदारी तक्रार दाखल करून पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. सुमारे दोन तास चाललेल्या घेरावानंतर ग्रामस्थांनी आंदोलन तूर्त स्थगित केले. मात्र, जखमी कामगाराला न्याय मिळेपर्यंत आणि अपघाताची जबाबदारी निश्चित होईपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवण्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली.













