जांभेकर विद्यालयात विविध भाषांतील कविता, नाट्यवाचनाने रंगला कार्यक्रम

रत्नागिरी : सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथालयात विविध पुस्तकांचे आकर्षक प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांनी भेट देऊन विविध विषयांवरील पुस्तकांची माहिती घेतली. त्यानंतर विविध भाषांतील कविता, नाट्यवाचन, पोवाडा, गीतगायन आणि पुस्तक प्रदर्शन अशा उपक्रमांमुळे वाचन प्रेरणा दिनाचा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.
प्रमुख वक्ते सचिन साठे यांनी वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व विशद करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. वाचनामुळे ज्ञानात भर पडते, विचारांना चालना मिळते आणि व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वाचन व अभ्यासाच्या जिद्दीचा दाखला दिला. विद्यार्थ्यांनीही वाचनासाठी अधिकाधिक वेळ देऊन आपले ज्ञान वाढवावे, विचार समृद्ध करावेत आणि व्यक्तिमत्त्व विकास साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
नमिता सागवेकर, मेघना जंगम, गार्गी, आरोही शिंदे, आर्य गावडे आणि कारकर या विद्यार्थिनींनी आपल्या स्वरचित कवितांचे वाचन केले. सक्षम मोसमकर याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील जोशपूर्ण पोवाडा सादर केला. त्याला श्रेया भातडे आणि उत्तरा कदम यांनी साथ दिली. अचल चौरे, नमिता सागवेकर आणि मेघना जंगम यांनी नाट्यवाचन सादर केले. प्रशालेतील विद्यार्थी फरीस मुजावर याने इंग्रजी भाषेतून डॉ. कलाम यांच्या जीवनकार्याविषयी विचार मांडले. योगिता नवरंगे हिने संस्कृतमधून वाचनाचे महत्त्व आणि प्रेरणादायी विचार व्यक्त केले.
शिक्षक सचिन गावडे यांनी कन्नड भाषेतील गीत मराठीत सादर करून दाद मिळवली. शिक्षिका स्नेहल पावरी यांनी विठ्ठल-रुक्मिणी यांच्यावरील भक्तिगीत सादर केले, तर शिक्षक राजेश कांबळे यांनी इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमातील कवितेचे वाचन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा संजना तारी यांनीही कविता वाचन करून साहित्याविषयीची आपली आवड व्यक्त केली. सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख दिव्यता नागवेकर यांनी केले.