एक नौका जळून खाक, दुसरीचेही नुकसान
मालवण l प्रतिनिधी : तारकर्ली किनाऱ्यावर उभ्या असलेल्या रापण मासेमारीच्या दोन नौकांना शुक्रवारी रात्री अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत एक नौका पूर्णपणे जळून खाक झाली, तर शेजारील दुसऱ्या नौकेचेही मोठे नुकसान झाले. या घटनेमुळे तारकर्ली परिसरात एकच खळबळ उडाली असून रापण मच्छिमारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तारकर्ली येथील नरेश कांदळगावकर आणि गुंडू कांदळगावकर यांच्या मालकीच्या या रापण नौका किनाऱ्यावर उभ्या होत्या. त्यापैकी एका नौकेला अचानक आग लागली. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केल्याने ही नौका जळून खाक झाली. आगीच्या झळा बसल्याने बाजूला असलेल्या दुसऱ्या नौकेचाही काही भाग जळाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक मच्छिमार आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मालवण नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाने आगीवर नियंत्रण मिळविले आग नेमकी कशामुळे लागली, हे स्पष्ट झालेले नाही.












