चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील टेरव गावचे सुपुत्र अभिजीत मनोहर यादव यांची अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी कोलगेट-पामोलिव्ह (इंडिया) लिमिटेडच्या एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट – लीगल या महत्त्वपूर्ण पदावर नियुक्ती झाली आहे. चिपळूण तालुका वकील संघाचे माजी अध्यक्ष आणि टेरवचे माजी सरपंच ॲड. मनोहर यादव यांचे ते ज्येष्ठ चिरंजीव आहेत.
चिपळूणमधून जागतिक स्तरावरील कंपनीच्या वरिष्ठ नेतृत्वपदापर्यंत मजल मारल्याने त्यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अभिजीत यादव यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण चिपळूणच्या युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी डी.बी.जे. महाविद्यालयातून अकरावी-बारावीचे शिक्षण पूर्ण केले. पुढे मुंबईतील प्रतिष्ठित शासकीय विधी महाविद्यालयातून (GLC), चर्चगेट येथून त्यांनी एलएल.बी. पदवी संपादन केली. एलएल.बी.च्या अंतिम वर्षातच कॅम्पस प्लेसमेंटद्वारे त्यांची मॅरिको कंपनीत लीगल मॅनेजर म्हणून निवड झाली आणि त्यांच्या कॉर्पोरेट क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात झाली. नोकरी सांभाळत त्यांनी बंगळुरू येथील नॅशनल लॉ स्कूलमधून मास्टर्स इन बिझनेस लॉ तसेच बौद्धिक संपदा हक्क (इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राइट्स) या विषयांतील उच्च शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी लॉरिअल या प्रसिद्ध सौंदर्यप्रसाधन कंपनीत आणि सनोफी या औषधनिर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीत हेड लीगल म्हणून जबाबदारी सांभाळली.
त्यांच्या कायदेविषयक ज्ञानाची आणि अनुभवाची दखल घेत २०१९ मध्ये कोलगेट-पामोलिव्हने त्यांची हेड- लीगल पदावर नियुक्ती केली होती. आता त्यांना एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट- लीगल या वरिष्ठ पदाची जबाबदारी मिळाली आहे. ॲड. मनोहर यादव यांचे धाकटे चिरंजीव ॲड. विश्वजीत यादव हेही चिपळूणमधील नामांकित वकील आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. अभिजीत यादव यांच्या या यशामुळे टेरव गावासह चिपळूणच्या नावलौकिकात भर पडली आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल चिपळूण तालुका वकील संघ, टेरव ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.













