चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण शहरातील लोकवस्तीत आरडीसीसी (RDCC) बँकेसमोर शुक्रवार दि. २३ रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास १२ फूट लांबीचा अजगर आढळून आला. याबाबतची माहिती सर्पमित्र व अॅडव्होकेट चिन्मय दीक्षित आणि शिवराज शिर्के यांना मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत अजगराला सुरक्षितरीत्या रेस्क्यू करून पकडले व पुढील कार्यवाहीसाठी वन विभागाच्या ताब्यात दिले. त्यानंतर चिपळूणचे वन परिक्षेत्र अधिकारी एस. एस. खान यांनी अजगराची पाहणी केली असता, सदर अजगर सुमारे १२ फूट लांबीचा असून सुस्थितीत असल्याची खात्री करण्यात आली.
विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरिजा देसाई आणि श्रीमती प्रियंका लगड, सहाय्यक वनसंरक्षक, रत्नागिरी (चिपळूण) यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. एस. एस. खान, वन परिक्षेत्र अधिकारी, चिपळूण, राहुल गुंठे, वनरक्षक, रामपूर आणि नंदकुमार कदम, वाहनचालक यांच्या उपस्थितीत सदर अजगराला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरीत्या मुक्त करण्यात आले. वन्यजीव हे निसर्गाच्या समतोलासाठी अत्यंत महत्त्वाचे असून, लोकवस्तीत वन्यप्राणी आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता त्यांना पकडण्याचा किंवा त्रास देण्याचा प्रयत्न करू नये. तात्काळ वन विभागाशी किंवा अधिकृत सर्पमित्रांशी संपर्क साधावा, असे आवाहन वन विभागामार्फत करण्यात येत आहे.












