इंग्रजी संभाषणासाठी स्वतंत्र डिजिटल ॲप ही नव्या शैक्षणिक क्षेत्राची गरज : शेखर सामंत

कनेडी हायस्कूलमध्ये ‘स्मार्ट इंग्लिश साथी’ ॲपचे उद्घाटन

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासासाठी स्तुत्य उपक्रम

कणकवली : शिक्षण क्षेत्रात दर्जेदार गुणवत्तेसोबत इंग्रजी संभाषणाचे कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे. इंग्रजी ही जागतिक स्तरावर संवाद साधण्याची भाषा आहे. मातृभाषेचा अभिमान जपत विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील संधी उपलब्ध करून देण्यासाठी इंग्रजी संभाषणाचे स्वतंत्र डिजिटल ॲप ही नव्या शैक्षणिक क्षेत्राची गरज आहे. कनेडी गट शिक्षण संस्थेने ‘स्मार्ट इंग्लिश साथी’ ॲप विकसित करून ही गरज पूर्ण केली आहे. हा उपक्रम जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अधिकाधिक शाळांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता असल्याचे मत शेखर सामंत यांनी व्यक्त केले.

 

कनेडी गट शिक्षण संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांसह पालकांनाही इंग्रजी संभाषण शिकता यावे, या उद्देशाने ‘स्मार्ट इंग्लिश साथी’ ॲप विकसित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याबरोबरच त्यांच्यात इंग्रजी संभाषणाचे कौशल्य विकसित व्हावे, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे. प्रशालेतील शिक्षक, संस्थाचालक आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून विकसित करण्यात आलेल्या या ॲपचे उद्घाटन शेखर सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.

 

यावेळी संस्थेचे अध्यक्ष सतीश सावंत, खजिनदार प्रकाश सावंत, चेअरमन राजाराम सावंत, संस्थेचे संचालक संजय सावंत, व्ही. बी. सावंत, शालेय समितीचे तुषार सावंत, संतोष सावंत, बावतीस घोणसाल्वीस, चंद्रशेखर वाळके, रायमन डिसोजा, प्राचार्य सुमंत दळवी, पर्यवेक्षक बयाजी बुराण आदी उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना शेखर सामंत म्हणाले की, कोणत्याही भाषेतून संवाद साधणे म्हणजे केवळ शब्दांची देवाणघेवाण नव्हे, तर ते एक कौशल्य आहे. इंग्रजी ही जागतिक भाषा असल्याने प्रत्येकाला ती अवगत असणे आवश्यक आहे. आपल्याला मातृभाषेचा अभिमान आहे आणि तो असलाच पाहिजे. मात्र, मातृभाषा जपत जागतिक स्तरावरील संधींचा लाभ घ्यायचा असेल, तर इंग्रजी भाषेचे ज्ञान आणि संभाषण कौशल्य असणे अत्यंत गरजेचे आहे.

 

पूर्वी इंग्रजी भाषेचे ज्ञान प्रामुख्याने शहरी भागातील तसेच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपुरते मर्यादित असल्याचे चित्र होते. मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही प्रचंड गुणवत्ता आहे. या विद्यार्थ्यांनी ठरवले, तर ते इंग्रजी भाषेवर चांगले प्रभुत्व मिळवू शकतात. कनेडी गट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या पुढाकारातून ‘केजीएसपीएम इंग्लिश संभाषण साथी’ ॲपच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने हा उपक्रम कौतुकास्पद असून, संस्थेचे विचार आणि स्वप्न निश्चितच साकार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील विविध भागांतील शैक्षणिक संस्थांपर्यंत हा उपक्रम पोहोचविण्यासाठी आपणही प्रयत्नशील राहू, असे त्यांनी सांगितले.

 

कनेडी शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक संकुलात प्रवेश केल्यानंतर येथे काहीतरी वेगळे घडत असल्याचे जाणवले. ग्रामीण भागातील शाळेमध्ये विविध शैक्षणिक उपक्रम राबविणे सोपे नसते. मात्र, सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने अनेक उपक्रम यशस्वीपणे उभे केले आहेत. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना टिकून राहता यावे, अशा पद्धतीने इंग्रजी संभाषणाचे ॲप विकसित करण्यात आले आहे. शाळेतील विविध उपक्रमांमध्ये या ॲपची भर पडली असून, विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासासाठी हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे, असेही सामंत यांनी नमूद केले.

 

आपल्या पत्रकारितेच्या प्रवासात अनेक गावांना भेटी देऊन विविध क्षेत्रांतील व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या. ज्येष्ठ व्यक्तींपासून शास्त्रज्ञ आणि सामान्य नागरिकांपर्यंत अनेकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. मात्र, कनेडी येथे आल्यानंतर आदर्श शैक्षणिक संकुल कसे असावे, याचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला, असे त्यांनी सांगितले. प्रशालेचा शंभर टक्के निकाल ही निश्चितच अभिमानाची बाब आहे; परंतु त्यापलीकडे विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत प्रगती करणे आणि स्वतःची कौशल्ये विकसित करणे अधिक महत्त्वाचे आहे. आजच्या स्पर्धात्मक जगात केवळ गुणांपेक्षा विद्यार्थ्यांकडे कोणती कौशल्ये आहेत, ती त्यांनी कशी आत्मसात केली आहेत आणि त्यांचा प्रभावी वापर कसा करता येतो, याला अधिक महत्त्व आहे. जगाच्या कोणत्याही भागात शिक्षण, व्यवसाय किंवा नोकरीच्या संधींचा लाभ घ्यायचा असेल, तर इंग्रजी भाषेचे ज्ञान उपयुक्त ठरते. त्यामुळे संस्थेने सुरू केलेला हा उपक्रम मला विशेष आवडला, असेही सामंत यांनी सांगितले.

 

यावेळी संस्थेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी शैक्षणिक संकुलात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. प्राचार्य सुमन सावंत यांनी या ॲपच्या निर्मितीमध्ये संस्थेचे संचालक डॉ. सागर सावंत यांचे तांत्रिक मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरल्याचे सांगितले. ॲप विकसित करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी प्रशालेतील विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते.