जिल्ह्याबाहेरील व्यक्तींच्या धमक्यांना घाबरू नका, राणे कुटुंबीय व लोकप्रतिनिधी मूर्तिकारांच्या पाठीशी – प्रमोद कामत

श्री गणेश मूर्तिकार संघातर्फे वार्षिक सभा व सन्मान सोहळा संपन्न

सावंतवाडी । प्रतिनिधी :श्री गणेश मूर्तिकार संघ सिंधुदुर्ग ही संघटना पारंपरिक मूर्तिकला जोपासण्याचे आणि नवीन मूर्तिकार घडवण्याचे कौतुकास्पद कार्य करत आहे. जिल्ह्यातील मूर्तिकारांच्या पाठीशी खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे हे ठामपणे उभे आहेत. त्यामुळे जिल्ह्याबाहेरील व्यक्तींच्या धमक्यांना मूर्तिकारांनी मुळीच घाबरून जाऊ नये, आम्ही पूर्णपणे तुमच्या सोबत आहोत, असा ठाम विश्वास सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत यांनी व्यक्त केला.

माजगाव येथील श्री सिद्धिविनायक हॉलमध्ये आयोजित श्री गणेश मूर्तिकार संघ, सिंधुदुर्गच्या वार्षिक सभा आणि सन्मान सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. सुरुवातीला दीपप्रज्वलन व श्री गणेशाच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या सोहळ्यास ज्येष्ठ पत्रकार सिताराम गावडे, पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर, मूर्तिकार संघाचे अध्यक्ष नारायण उर्फ बापू सावंत, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, मूर्तिकार विलास मळगावकर, देवरुख कॉलेजचे प्राचार्य रणजीत मराठे, सूत्रसंचालक मनोहर सरमळकर, ज्येष्ठ मूर्तिकार चंद्रकांत मेस्त्री, खजिनदार दीपक जोशी, सचिव उदय राऊत, उपाध्यक्ष राधाकृष्ण नाईक, अजय परब, उदय अळवणी यांच्यासह अनेक मान्यवर व मूर्तिकार उपस्थित होते.

*मूर्तिकारांच्या मागण्यांसाठी लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करणार : प्रमोद कामत*

प्रमोद कामत पुढे म्हणाले की, दशावतारी कलाकारांप्रमाणेच मूर्तिकार कलाकारांनाही योग्य न्याय आणि मानधन मिळाले पाहिजे. मूर्तिकारांच्या न्याय्य मागण्यांसंदर्भात पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले जाईल. तसेच मूर्तिकारांना माफक व्याजदरात कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्याकडेही विशेष सवलतीसाठी प्रयत्न करू. जिल्ह्यातील मूर्तिकारांवर बाहेरून येऊन कोणी दबाव आणण्याचा किंवा धमकावण्याचा प्रयत्न करत असेल, तर राणे कुटुंबीयांचा धाक निश्चितच उपयोगी ठरेल. नव्या पिढीला पारंपरिक मूर्तिकलेचे प्रशिक्षण देऊन नवीन कलाकार घडवण्याचे संघाचे काम अत्यंत भूषणावध असून, सर्वांनी संघटितपणे ही कला कायम टिकवावी, असे आवाहन त्यांनी केले.

मातीला जीवंतपणा देणाऱ्या कलाकारांना न्याय मिळालाच पाहिजे : सिताराम गावडे

ज्येष्ठ पत्रकार सिताराम गावडे म्हणाले की, मातीला सुबक आकार देऊन कला जिवंत ठेवण्याचे महान कार्य मूर्तिकार करत असतात. मोबाईल आणि आधुनिकतेच्या युगातही नवीन कलाकार घडवणे ही कौतुकास्पद बाब आहे. गणेशोत्सव हा आपल्या संस्कृतीचा मुख्य आधार असून, पर्यावरणपूरक मातीची मूर्ती घडवणाऱ्या या कलाकारांना मानधन व इतर सवलती मिळायलाच हव्यात. सिंधुदुर्गातील मूर्तिकारांना बाहेरून येऊन कोणी धमकावण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही ते सहन करणार नाही आणि मूर्तिकारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू.

*शाडू माती पुरवठा व मानधनाची अध्यक्षांची मागणी:*

प्रास्ताविकात संघाचे अध्यक्ष नारायण (बापू) सावंत यांनी संघटना राबवत असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. तरुण पिढीसाठी कार्यशाळांच्या माध्यमातून मूर्तिकलेचे धडे दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मूर्तिकारांना शासकीय कलाकारांच्या यादीत समाविष्ट करावे, गोवा राज्याच्या धर्तीवर मानधन लागू करावे, ‘सिंधुरत्न’ योजनेतून साहित्य खरेदीसाठी प्राधान्य मिळावे, मुंबई महानगरपालिकेप्रमाणे शाडूची माती मोफत किंवा सवलतीच्या दरात उपलब्ध व्हावी आणि जिल्ह्याबाहेरील घटकांकडून होणाऱ्या दमदाटीपासून संरक्षण मिळावे, अशा प्रमुख मागण्या त्यांनी प्रशासनासमोर व व्यासपीठावर मांडल्या.

जेष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांनी श्री गणेश मूर्तीकार संघटनेच्या माध्यमातून कलाकारांना प्रोत्साहन दिले जात आहे याचे कौतुक केले. तसेच दशावतार कलाकारा प्रमाणे मुर्तीकाराना मानधन मिळाले पाहिजे असे मत व्यक्त केले.

ज्येष्ठ मूर्तिकारांचा गौरव:

या सोहळ्यात ज्येष्ठ मूर्तिकार चंद्रकांत मेस्त्री यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच निमंत्रित पाहुण्यांचा सत्कार अध्यक्ष बापू सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मनोहर सरमळकर यांनी केले.

यावेळी समीर वर्दम, अशोक कडु, शिवम जोशी, प्रकाश सावंत, गुरूदास गवंडे यांच्यासह मुर्तीकार उपस्थित होते.