रामेश्वर संस्थान आचराच्या गणपतीला भक्तीपूर्ण वातावरणात निरोप

विसर्जन मिरवणूकीला भाविकांचा लोटला जनसागर

आचरा–अर्जुन बापर्डेकर

इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरेच्या विघ्नहर्त्याला चौघड्यावरचा गणपतीला शनिवारी 41 दिवसांनी साश्रू नयनांनी भक्तीमय वातावरणात सायंकाळी उशिरा आचरा पिरावाडी येथे समुद्र किनारी विसर्जन करत निरोप देण्यात आला आणि गेले41 दिवस विविधांगी कार्यक्रमानी नटलेल्या या गणेशोत्सवाची सांगता झाली.या उत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन देवस्थान समिती आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात आले होते.यात किर्तन,दशावतार, फुगडी स्पर्धा, डबलबारी भजनाचे सामने, रेकॉर्ड डान्स,गृपडान्स स्पर्धा, होममिनिस्टर,यांसह विविध स्पर्धात्मक कार्यक्रम आदींचे वाडीवाडीवार तसेच भाविकांकडून आयोजन करण्यात आले होते.याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. शनिवारी दुपारी गणपती विसर्जन मिरवणूक रामेश्वर मंदिर येथून पारंपरिक पद्धतीने ढोलताशांच्या गजरात निघाली. आचरा तिठा,बाजारपेठ मार्गे सायंकाळी गाउडवाडी येथून श्री देव चव्हाटा येथे पोहोचली तेथून पारंपारीक पद्धतीने पिरावाडी ग्रामस्थांनी गणपती सायंकाळी उशिरा आचरा समुद्र किनारी नेत महाआरती करुन मावळत्या सुर्याच्या साक्षीने बाप्पाला निरोप देण्यात आला. मिरवणूकीत आचरा बीटस बॅंजो पथकाने रंगत आणली होती . ठिक ठिकाणी भाविकांनी तोरणे, रांगोळी काढत, फुलांचा वर्षाव करत गणरायाचे स्वागत केलेहोते.आचरा वासियांतर्फे मिरवणूकीत सहभागी भाविकांसाठी थंड पाणी,सरबत,आईस्क्रीम, लाडू मोदकाचे वाटप केले जात होते.आचरा तिठा येथे दांडपट्टा, बनाटीआदी विविधांगी कवायतींनी या मिरवणूकीत रंगत आणली होती.


सायंकाळी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या घोषात साश्रू नयनांनी पिरावाडी
येथील समुद्र किनारी गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. गणरायाला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणूकीत भाविकांनी अलोट गर्दी केली होती.आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातीवले यांनी मिरवणूकीत चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.