वैशाली हेगिष्टे यांच्या हत्येच्या अनुषंगाने ग्रामस्थांची मागणी, पोलीस निरीक्षकांना निवेदन
संतोष कोत्रे
लांजा-: तालुक्यातील वेरवली रामवाडी येथील वैशाली हेगिष्टे यांच्या दागिने चोरी आणि हत्येच्या घटनेच्या अनुषंगाने यापूर्वी परिसरात घडलेल्या संशयास्पद मृत्यू तसेच दागिने चोरीच्या घटनांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी वेरवली गावातील लाडवाडी, रामवाडी आणि तेलिवाडी येथील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली असून याबाबतचे सामूहिक निवेदन आज शनिवारी लांजा पोलीस निरीक्षक यांना सादर करण्यात आले.
लांजा तालुक्यातील वेरवली रामवाडी येथील रहिवासी असलेल्या वैशाली विलास हेगिष्टे यांचे दागिने चोरी करून त्यांचा खून करण्यात आल्याची घटना १९ ऑक्टोबर रोजी घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी प्रमोद खेडेकर याला बेड्या ठोकल्या
आहेत.
या पार्श्वभूमीवर आज शनिवारी ग्रामस्थांनी यांचा पोलीस ठाणे येथे निवेदन सादर केले. यामध्ये म्हटले आहे की,आम्ही लाडवाडी, रामवाडी आणि तेलिवाडी येथील समस्त ग्रामस्थ आपणास विनम्र निवेदन करतो की, आमच्या परिसरात घडलेल्या अलीकडील हत्येच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीच चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
वैशाली हेगिष्टे यांच्या हत्तच्या
घटनेमुळे परिसरातील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या हातातील बांगड्यांची चोरीही करण्यात आली आहे.या गंभीर गुन्ह्याच्या प्रकरणात पोलिसांनी तत्परतेने कारवाई करून संशयित आरोपीला ताब्यात घेतल्याबद्दल आम्ही लाडवाडी, रामवाडी व तेलिवाडी येथील समस्त ग्रामस्थांच्या वतीने पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त करतो.
वैशाली हेगिष्टे यांच्या हत्या प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपीला कायद्यानुसार कठोर कारवाई करावी. तसेच या गुन्ह्यात संशयित आरोपीव्यतिरिक्त अन्य कोणाचा सहभाग आहे का, कोणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत केली आहे का? याचीही चौकशी करण्याची यावी. त्याचप्रमाणे हेगिष्टे यांच्या हातातील बांगड्या चोरीला गेल्याची घटना तसेच चोरीस गेलेल्या अन्य वस्तूंचा शोध घेऊन त्या जप्त करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असेही निवेदनात म्हंटले आहे.
याशिवाय, चार वर्षांपूर्वी वेरवली येथील भाई लाड यांच्या सून नम्रता लाड यांच्या मृत्यूच्या वेळी त्यांच्या देखील अंगावरील दागिने चोरीला गेल्याच्या घटना घडली होती. चार वर्षांपूर्वीची नम्रता लाड यांच्या मृत्यूच्या वेळी दागिने चोरीला जाण्याची घटना आणि १९ ऑक्टोबर रोजी झालेल्या वैशाली हेगिष्टे यांच्या हत्या प्रकरणातील दागिने चोरी यांच्यात काही संबंध आहे का, याचीही पडताळणी करण्यात यावी. तसेच वेरवली येथील यापूर्वीच्या संशयास्पद मृत्यू आणि चोरी प्रकरणांचा सुरू असलेला तपास आणि सद्यस्थितीतील हत्या प्रकरण यांचा काही संबंध आहे का, याचीही सखोल चौकशी करण्याची मागणी वेरवली येथील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.
सदर निवेदन सादर करताना वेरवली येथील लाडवाडी, रामवाडी आणि तेलीवाडी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.











