महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी आवाहन
अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने देऊ नका
कणकवली : महामार्गावर दिवसेंदिवस वाढणारे रस्ते अपघात आणि त्यातून होणारी जीवितहानी ही चिंतेची बाब बनली आहे. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येक वाहनचालकाने वाहतुकीचे नियम पाळून जबाबदारीने वाहन चालवावे. स्वतःच्या सुरक्षिततेसोबतच इतरांच्या जीवाचीही काळजी घ्यावी, असे आवाहन महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्राच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली आडकुर यांनी केले आहे.
महामार्गावर वाहन चालविताना निर्धारित वेगमर्यादेचे पालन करणे आवश्यक आहे. वेगावर नियंत्रण ठेवावे, दुचाकी चालविताना हेल्मेटचा, तर चारचाकी वाहनात सीटबेल्टचा वापर करावा. मद्यपान करून वाहन चालविणे टाळावे. वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे किंवा संदेश पाहणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे वाहन चालविताना मोबाईलचा वापर करू नये. पुढील वाहनापासून सुरक्षित अंतर राखावे आणि घाईघाईने ओव्हरटेक करणे टाळावे, असेही त्यांनी सांगितले.
महामार्गावर दुचाकीने प्रवास करताना चालकासह पाठीमागे बसलेल्या व्यक्तीनेही हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. हेल्मेटचा वापर न केल्यामुळे अपघातात डोक्याला गंभीर दुखापत होऊन जीवितहानी होण्याचा धोका असतो. वाहन चालविताना झोप किंवा थकवा जाणवत असल्यास वाहन सुरक्षित ठिकाणी थांबवून विश्रांती घ्यावी. तसेच लेन शिस्त, दिशादर्शक चिन्हे आणि वाहतूक सूचनांचे पालन करावे.
काही मिनिटे वाचविण्याच्या घाईत स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नये. पालकांनीही आपल्या मुलांच्या सुरक्षिततेबाबत विशेष काळजी घ्यावी. अल्पवयीन मुलांच्या हट्टापायी त्यांच्या हातात वाहने देऊ नयेत. वाहन चालविण्यासाठी आवश्यक वय आणि परवान्याबाबतच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली आडकुर यांनी केले.
रस्ते अपघात रोखणे ही केवळ पोलिसांची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचेही कर्तव्य आहे. त्यामुळे प्रत्येक वाहनचालकाने वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळून सुरक्षित प्रवासाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन महामार्ग वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.













