शिरगाव (प्रतिनिधी) :
ऐतिहासिक परंपरेचा वारसा लाभलेल्या आणि चौऱ्याऐंशी खेड्यांचा अधिपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवगड तालुक्यातील साळशी येथील इनामदार श्री देव सिद्धेश्वर-पावणाई देवस्थानचा कार्तिकोत्सव रविवार, २५ ऑक्टोबर (कोजागरी पौर्णिमा) पासून मंगळवार, २४ नोव्हेंबर (त्रिपुरारी पौर्णिमा) पर्यंत उत्साहात साजरा करण्यात येत आहे.
कोजागरी पौर्णिमेपासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत महिनाभर चालणाऱ्या या उत्सवात इनामदार श्री देव सिद्धेश्वर मूर्तीची श्री सिद्धेश्वर, पावणाई व रवळनाथ मंदिराभोवती पारंपरिक पालखी प्रदक्षिणा काढली जाते. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी रात्री पालखी प्रदक्षिणेनंतर उत्सवमूर्ती इनामदार श्री देव सिद्धेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात विराजमान केली जाते.
यानंतर उपस्थित भाविकांना चुरमुऱ्यांचा प्रसाद वाटला जातो. तसेच देवालय परिसरासह समोरील दीपमाळा पणत्यांच्या प्रकाशाने उजळून निघतात. या तेजोमय वातावरणात त्रिपुरारी पौर्णिमेचा सोहळा भक्तिभावात पार पडतो.













