मंडणगड (प्रतिनिधी): लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महाकवी ‘महर्षि वाल्मिकी’ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. विष्णु जायभाये, दापोली अर्बन महाविद्यालयाचे डॉ. राजेंद्र मोरे, डॉ. अशोक साळुंखे, डॉ. संगीता घाडगे, डॉ. मुकेश कदम, डॉ. सूरज बुलाखे] ग्रंथपाल डॉ. दगडू जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर व डॉ. राजेंद्र मोरे यांच्या हस्ते महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तत्पूर्वी डॉ. संगीता घाडगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी बोलताना प्रभारी प्राचार्य डॉ.वाल्मिक परहर यांनी सांगितले की, महाकवी महर्षि वाल्मिकी हे केवळ एक ऋषी नव्हते, तर ते एक महान रचनाकार होते. त्यांनी संस्कृत भाषेतील महाकाव्य मानल्या गेलेल्या ‘रामायण’ या ग्रंथाची रचना केली. पौराणिक आख्यानिकेनुसार त्यांचे मूळ नाव ‘रत्नाकर’ असे होते. सुरुवातीच्या काळात ते वाटसरुंना लूटून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत असत. परंतु नारद मुनीच्या भेटीनंतर व त्यांच्या उपदेशामुळे त्यांचे हद्यपरिवर्तन झाले. त्यानंतर त्यांनी कठोर तपश्चर्या केली ज्यामुळे त्यांना ‘महर्षि वाल्मिकी’ हे नाव मिळाले. म्हणून आजही त्यांचे कार्य व जीवनप्रवास प्रेरणादायी व आदर्शत आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्याचा आदर्श आपल्या डोळयासमोर ठेवावा असे सांगितले.
कार्यक्रमास शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी उपस्थितांचे आभार डॉ. अशोक साळुंखे यांनी मानले.













