मंडणगड:
एसटी बसमध्ये आरक्षित जागेवर बसण्यावरून झालेल्या वादातून एका महिला प्रवाशाने कर्तव्यावर असलेल्या एसटी वाहकाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना मंडणगड बसस्थानकात घडली आहे. याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात संबंधित महिलेविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी केशव अशोक पांढरे (वय ४२) हे मंडणगड एसटी डेपोत वाहक म्हणून कार्यरत आहेत. मंगळवार, १२ मे २०२६ रोजी ते नालासोपारा ते डौली या एसटी बसवर (क्रमांक MH 20 BL 3337) ड्युटीवर होते. ही बस नालासोपारा येथून मंडणगड येथे आली असता, बसमधील आसन क्रमांक १९, २० आणि २१ वर आरक्षण असलेल्या महिला प्रवाशाने वाहकाशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. सदर महिला प्रवासी कांदिवली समतानगर येथील बस स्टॉपवर थांबली नव्हती, तरीही तिने बोरीवली-दापोली बसने मंडणगड गाठले आणि तिथे पोहोचल्यावर फिर्यादी पांढरे यांच्याशी वाद घातला.
मंडणगड बसस्थानकातील कंट्रोल केबिनजवळ हा वाद विकोपाला गेला. यावेळी आरोपी महिला रिद्धी प्रफुल्ल लाड (रा. गवळवाडी कांगवाई, ता. दापोली) हिने गणवेशात कर्तव्यावर असलेल्या वाहक पांढरे यांची शर्टची कॉलर पकडून त्यांना शिवीगाळ केली आणि कानाखाली मारून मारहाण केली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी रिद्धी लाड हिच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १३२, ११५(२) आणि ३५२ अन्वye गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.












