जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुक : ऐन दिपावलीत फुंकले रणशिंग !

रत्‍नागिरी : 
जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेच्‍या निवडणुकीचे रणशिंग ऐन दिपावलीत फुंकले जाण्‍याची शक्‍यता असून, मध्‍यवर्ती बँकेच्‍या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर झाली आहे. जिल्‍ह्यात विविध संस्‍था, वैयक्‍तिक असे 1203 एकूण मतदार आहेत. येत्‍या दहा बारा दिवसात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्‍याची शक्‍यता असून, मतदान डिसेंबरमध्‍ये होणार आहे.
रत्‍नागिरी जिल्‍हा सहकारी मध्‍यवर्ती बँकेच्‍या संचालक मंडळाचा कार्यकाळ डिसेंबरमध्‍ये संपत आहे. त्‍यामुळे निवडणुकीचे रणशिंग आता ऐन दीपावलीत फुंकले जाणार आहे. सहकार विभागाकडून निवडणुकीपूर्वीची प्रक्रिया सुरु झाली आहे. मतदार यादी तयार करुन अंतिम मतदार यादी उपनिबंधक कार्यालयासह, जिल्‍हा बँक व तालुक्‍यातील जिल्‍हा बँकेच्‍या प्रमुख शाखांमध्‍ये सोमवार 26 ऑक्‍टोबर रोजी जाहीर करण्‍यात आली आहे. जिल्‍हा बँकेच्‍या निवडणुकीत एकूण 1203 मतदार मतदानाचा हक्‍क बजावणार आहेत.
यापूर्वी जिल्‍हा बँकेत 21 संचालक होते. आता चार संचालकांची वाढ झाल्‍याने 25 संचालकांसाठी मतदान होणार आहे. यात तालुकास्‍तराव नऊ संचालकांचा समावेश आहे. एकूण 1203 मतदारांमध्‍ये प्राथमिक कृषी पतपुरवठा व वि. का. सेवा सहकारी संस्‍था तसेच धान्‍य अधिकोष सहकार संस्‍था यांचे सर्वाधिक 337 मतदार जिल्‍ह्यात आहेत. दुग्‍ध संस्‍था, पशुपैदास संस्‍था, वराहपालन संस्‍था, पाणीपुरवठा संस्‍थांचे 48, कुक्‍कुटपाल व शेळीमेंढीपालन संस्‍थांचे 18, कृषीपणन, शेतीमाल प्रक्रिया संस्‍थांचे 80, सर्वसाधारण-ट्रस्‍ट, मंडळ व व्‍यक्‍ती 126, नागरी सहकारी पतसंस्‍था, ग्रामीण बिगरशेती पतसंस्‍था व नागरी सहकारी बँकांचे 136, गृहनिर्माण, गृहतारण सहकारी संस्‍थांचे 136, पगारदार नोकरांच्‍या संस्‍थांचे 53, मजूर संस्‍थांचे 94, स्‍वयंरोजगार, बेरोजगार व हमाल कामगार सहकारी संस्‍थांचे 49, औद्योगिक वाहतूक व्‍यवसाय, देखरेख उत्‍पादक सहकारी संस्‍था 40, मच्‍छीमार सहकारी संस्‍था व अन्‍य सहकारी संस्‍था 86 असे 1203 मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्‍क बजावणार आहेत.
जिल्‍हा बँक निवडणुकीसाठी दहा ते बारा दिवसात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्‍याची शक्‍यता असल्‍याने ऐन दिपावलीतच रणसंग्रामाला सुरुवात होणार असून डिसेंबरमध्‍ये याचे फटाके फुटणार आहेत