ऐन सकाळच्या धावपळीत आणि कामकाजाच्या वेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांसह व्यावसायिक त्रस्त
महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे प्रदेशाध्यक्ष अॅड. प्रसाद करंदीकर यांची माहिती; महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन
देवगड : प्रतिनिधी
देवगड-जामसंडे शहरात कोणतीही पूर्वसूचना न देता ऐन सकाळच्या धावपळीच्या वेळी तसेच व्यावसायिक कामकाज सुरू असताना वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने सर्वसामान्य नागरिक, छोटे व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक आणि पर्यटन व्यावसायिकांची मोठी गैरसोय होत आहे. या प्रकारामुळे व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या वतीने बुधवार, दि. ४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता देवगड येथील महावितरण कार्यालयासमोर निषेध व धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे प्रदेशाध्यक्ष अॅड. प्रसाद करंदीकर यांनी निवेदनाद्वारे दिली.
वीज ही केवळ मूलभूत सुविधा नसून नागरिकांचे दैनंदिन जीवन, दुकाने, हॉटेल व्यवसाय, पर्यटन व्यवसाय आणि विविध सेवा उद्योगांसाठी अत्यावश्यक आहे. विशेषतः पर्यटनावर अवलंबून असलेल्या देवगड परिसरातील व्यावसायिकांचे आर्थिक व्यवहार आणि रोजगार वीजपुरवठ्यावर अवलंबून असतात. मात्र, किरकोळ दुरुस्ती किंवा अन्य तांत्रिक कारणांसाठी अचानक वीजपुरवठा खंडित केला जातो. काही वेळा वीज बंद ठेवण्याची सूचना ऐनवेळी दिली जात असल्याने नागरिकांना आणि व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
छोट्या व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान
वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे हॉटेलमधील कामकाज, खाद्यपदार्थांची तयारी, पाणीपुरवठा, ऑनलाइन व्यवहार आणि दुकानांमधील दैनंदिन कामे विस्कळीत होतात. मोठ्या उद्योगांप्रमाणे पर्यायी व्यवस्था उभारण्याची आर्थिक क्षमता प्रत्येक छोट्या व्यावसायिकाकडे नसते. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी नागरिकांना पुरेशी पूर्वसूचना देणे आणि दुरुस्तीच्या कामांचे नियोजन करताना नागरिकांच्या वेळेचा व व्यावसायिकांच्या आर्थिक हिताचा विचार करणे आवश्यक असल्याचे समितीने म्हटले आहे.
लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा
महावितरणच्या या कार्यपद्धतीच्या निषेधार्थ स्थानिक नागरिक, ग्राहक, व्यापारी आणि पर्यटन व्यावसायिकांच्या सहभागातून आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन लोकशाही मार्गाने आणि घटनात्मक चौकटीत राहून शांततेत केले जाईल, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करत, कोणत्याही अनुचित प्रकाराला आंदोलनाला गालबोट लावू दिले जाऊ नये, असेही निवेदनात नमूद केले आहे.
या संदर्भात महावितरणचे उपकार्यकारी अभियंता, देवगड यांना निवेदन देण्यात आले असून, वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी योग्य पूर्वसूचना देणे आणि नागरिकांची व व्यावसायिकांची गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे, ही प्रमुख मागणी असल्याचे अॅड. प्रसाद करंदीकर यांनी स्पष्ट केले.












