सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाचा निर्णय; एक लाख रुपयांचा दंड, ५० हजार रुपये पीडितेला देण्याचे आदेश
सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी
वेश्याव्यवसायासाठी पीडित महिलांना आणून ग्राहकांना पुरविल्याप्रकरणी सावंतवाडी तालुक्यातील आजगाव येथील संतोष मधुकर लुडबे (वय ५२) याला सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने १० वर्षे सश्रम कारावास आणि एक लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंडाच्या रकमेतून ५० हजार रुपये पीडित महिलेला, तर ५० हजार रुपये शासनाकडे जमा करण्याचे आदेश प्रधान जिल्हा व प्रमुख सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी दिले.
वेंगुर्ला पोलीस ठाण्यात २०२३ मध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक ४२/२०२३ अन्वये भारतीय दंड विधान कलम ३७० तसेच स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ च्या कलम ३, ४ व ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीने ‘अन्नपूर्णा सेक्स वर्कर फाउंडेशन’ या संस्थेच्या नावाखाली पीडित महिलांना वेश्याव्यवसायासाठी आणून ग्राहकांना पुरविल्याचे आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर स्वतःची उपजीविका भागविल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.
या गुन्ह्याचा तपास वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अतुल माधवराव जाधव यांनी केला. त्यांनी तांत्रिक व परिस्थितीजन्य पुराव्यांसह न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यात सरकारी अभियोक्ता संदीप अशोक राणे यांनी अभियोग पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडली. न्यायालयाने सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून आरोपीला दोषी ठरविले.
भारतीय दंड विधान कलम ३७० अंतर्गत आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व एक लाख रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावास, अशी शिक्षा सुनावण्यात आली. अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ३ अंतर्गत एक वर्ष सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड, कलम ४ अंतर्गत एक वर्ष सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड, तर कलम ५ अंतर्गत तीन वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड सुनावण्यात आला. या कलमांखालील दंड न भरल्यास प्रत्येकी दोन महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.
न्यायालयीन कामकाजादरम्यान पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र दळवी आणि पोलीस अंमलदार चंद्रकांत चव्हाण यांनी सरकारी अभियोक्त्यांना मदत केली.या प्रकरणातील शिक्षेच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी तपास अधिकारी, सरकारी अभियोक्ता तसेच तपासात मदत करणारे तत्कालीन वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन केले.










