पर्यटन प्रकल्पांना विरोधासाठी विरोध नको; स्थानिक
रोजगारनिर्मितीसाठी एकत्र येण्याचे आवाहन
मालवण, वेंगुर्ल्याच्या धर्तीवर देवगड पर्यटनाचा विकास करण्याचा निर्धार
देवगड l प्रतिनिधी : निसर्गसौंदर्य, विस्तीर्ण समुद्रकिनारे, सुंदर खाड्या, ऐतिहासिक वास्तू आणि धार्मिक स्थळांचे वैभव लाभलेल्या देवगड तालुक्यात पर्यटन विकासाला मोठी संधी आहे. मात्र, मालवण आणि वेंगुर्ल्याच्या तुलनेत देवगड पर्यटनाच्या बाबतीत मागे राहिल्याची खंत व्यक्त करत, ‘पर्यटन वाढवूया, देवगड घडवूया!’ या संकल्पनेतून एकत्र आलेल्या युवकांनी पर्यटनाच्या माध्यमातून देवगडचा विकास साधण्याचा निर्धार व्यक्त केला. पर्यटन प्रकल्पांना केवळ विरोधासाठी विरोध न करता, स्थानिकांचे हित जपत रोजगार आणि व्यवसायाच्या संधी निर्माण करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्याची गरज युवकांनी अधोरेखित केली.
देवगड येथील पवनचक्की रोडवरील शासकीय विश्रामगृहात गुरुवारी आयोजित चर्चासत्राला तालुक्यातील युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. देवगडच्या पर्यटन विकासासाठी काय करता येईल, स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील आणि पर्यटनाच्या माध्यमातून तालुक्यात पर्यटकांचा ओघ कसा वाढवता येईल, यावर उपस्थितांनी आपली मते मांडली. देवगडला पर्यटनाच्या नकाशावर ठळक स्थान मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचा सूर या चर्चासत्रात उमटला.
देवगड तालुक्यात पर्यटनासाठी पोषक वातावरण आणि अनेक आकर्षक ठिकाणे उपलब्ध आहेत. तरीही या साधनसंपत्तीचा पुरेपूर उपयोग करून घेण्यात आपण मागे पडत आहोत. पर्यटनाचा विकास झाल्यास स्थानिक युवकांना गावातच रोजगार मिळू शकतो. हॉटेल व्यवसाय, होम स्टे, स्थानिक खाद्यपदार्थ, जलक्रीडा, बोटिंग, मार्गदर्शक सेवा, वाहतूक तसेच स्थानिक उत्पादनांच्या विक्रीतून अनेकांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे पर्यटनाकडे केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून न पाहता, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारे प्रभावी माध्यम म्हणून पाहण्याची गरज युवकांनी व्यक्त केली.
पर्यटन प्रकल्पांना विरोधासाठी विरोध नको!
पर्यटनाच्या माध्यमातून अनेक स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे एखाद्या पर्यटन प्रकल्पाला केवळ विरोध करण्याऐवजी, त्या प्रकल्पामुळे स्थानिकांना काय लाभ होईल, संभाव्य अडचणी कशा दूर करता येतील आणि पर्यावरणासह पारंपरिक व्यवसायांचे संरक्षण कसे करता येईल, यावर चर्चा होणे आवश्यक आहे, अशी भूमिका चर्चासत्रात मांडण्यात आली. विकासाच्या प्रत्येक उपक्रमाकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याऐवजी, योग्य नियोजन आणि आवश्यक नियमांच्या चौकटीत पर्यटन प्रकल्प पुढे नेण्याचा प्रयत्न झाला पाहिजे, असे मत युवकांनी व्यक्त केले.
मच्छीमारांचे हित जपत पर्यटन विकास साधण्याची गरज
देवगडचा किनारपट्टीचा भाग हा पारंपरिक मच्छीमारांच्या उपजीविकेचा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे पर्यटन विकास करताना मच्छीमारांच्या व्यवसायावर परिणाम होणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. पर्यटन व्यावसायिक, मच्छीमार, ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधून संभाव्य वादांवर चर्चेतून मार्ग काढता येऊ शकतो. स्थानिकांच्या हिताचे संरक्षण आणि पर्यटनातून रोजगारनिर्मिती या दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी परस्पर सहकार्याची भूमिका आवश्यक असल्याचे मत यावेळी मांडण्यात आले.
युवकांच्या पुढाकारातून देवगडला नवी दिशा
शहरांमध्ये नोकरीसाठी स्थलांतर करण्याऐवजी आपल्या गावातच व्यवसाय उभारण्याची इच्छा असलेल्या युवकांना पर्यटन क्षेत्रात मोठी संधी आहे. त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण, पायाभूत सुविधा, मार्गदर्शन आणि आर्थिक पाठबळ उपलब्ध करून देण्याची गरज आहे. ग्रामस्थ आणि पर्यटन व्यावसायिकांनी एकत्र येऊन स्थानिक पर्यटनपूरक उपक्रम राबविल्यास देवगडमध्ये पर्यटकांचा ओघ वाढू शकतो. त्यातून स्थानिक बाजारपेठेला चालना मिळून अनेक कुटुंबांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.
राजकीय मतभेद आणि संकुचित दृष्टिकोन बाजूला ठेवून देवगडच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहनही युवकांनी केले. पर्यटनाच्या माध्यमातून देवगडचा सर्वांगीण विकास साधण्याचा आणि स्थानिक युवकांसाठी रोजगाराची नवी दारे खुली करण्याचा निर्धार व्यक्त करत, ‘पर्यटन वाढवूया, देवगड घडवूया!’ हा संदेश देत युवकांनी पर्यटन विकासासाठी एकजुटीने पुढाकार घेण्याचा एल्गार केला.













