कोलगाव-नाईकबाग रस्त्यावर पुन्हा कचऱ्याचे साम्राज्य

ग्रामपंचायतीचा फलक केवळ शोभेसाठीच?

कारवाईचा इशारा देणारा फलक असूनही कचरा टाकण्याचे प्रकार सुरूच 

सावंतवाडी : प्रतिनिधी

 

कोलगाव-नाईकबाग रस्त्यावर पुन्हा एकदा कचऱ्याचे ढीग साचू लागल्याने परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रस्त्याच्या कडेला प्लास्टिकच्या पिशव्या, हॉटेलमधील शिळे व उरलेले अन्न, दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि अन्य कचरा उघड्यावर फेकला जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असून परिसराच्या स्वच्छतेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, याच ठिकाणी कचरा टाकू नये आणि कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देणारा ग्रामपंचायतीचा फलक लावण्यात आला आहे. मात्र, फलकावरील इशाऱ्याला केराची टोपली दाखवत कचरा टाकण्याचे प्रकार सुरूच आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीचा हा फलक केवळ शोभेसाठीच आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

 

या समस्येबाबत ग्रामपंचायतीकडे तक्रारी करूनही ग्रामसेवक किंवा प्रशासकांकडून ठोस दखल घेतली जात नसल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे. केवळ सूचना फलक लावून जबाबदारी संपत नाही, तर कचरा टाकणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर प्रत्यक्ष दंडात्मक कारवाई करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. उघड्यावर टाकण्यात येणाऱ्या शिळ्या अन्नामुळे दुर्गंधी पसरत असून प्लास्टिक कचऱ्यामुळे परिसराच्या पर्यावरणालाही धोका निर्माण होत आहे. त्यामुळे या मार्गावरील कचऱ्याची नियमित साफसफाई करणे, कचरा टाकणाऱ्यांवर लक्ष ठेवणे आणि पुन्हा कचरा साचणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक बनले आहे.

ग्रामपंचायतीने स्वच्छतेच्या दाव्यांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीतून आपली जबाबदारी पार पाडावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. कोलगाव-नाईकबाग रस्ता कचरामुक्त करण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलावीत, अन्यथा ग्रामपंचायतीच्या स्वच्छता मोहिमेचा उपयोग काय, असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.