३० कोटींच्या रस्ते कामांचे भूमिपूजन;कुडाळ एमआयडीसीला मिळणार विकासाची नवी झळाळी
स्वप्निल कदम (कुडाळ): पारंपरिक शेती टिकलीच पाहिजे; मात्र शेती हा आपल्या जीवनमानाचा ‘प्लॅन ए’ असेल, तर ‘प्लॅन बी’ म्हणून उद्योग-व्यवसायही तितक्याच ताकदीने उभे राहिले पाहिजेत. उद्योगांमध्ये गुंतवणूक वाढली आणि नवीन उद्योग आले, तरच मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होऊन सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावेल. कुडाळ एमआयडीसीचा सर्वांगीण विकास करून चाकणच्या धर्तीवर आधुनिक औद्योगिक वसाहत उभी करण्याचा आपला प्रयत्न आहे, असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी केले.
कुडाळ शहरातील एमआयडीसी कॉर्नर ते पिंगुळी म्हापसेकर तिठा तसेच एमआयडीसीमधील अंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरणासह काँक्रीटीकरण करण्यासाठी राज्य शासनाकडून तब्बल ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून करण्यात येणाऱ्या कामांचा भूमिपूजन सोहळा आमदार निलेश राणे यांच्या हस्ते पार पडला. या कामांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असून कुडाळ शहराच्या विकासाला नवी गती मिळणार आहे.
यावेळी बोलताना आमदार राणे म्हणाले की, निवडणुकीपूर्वी एमआयडीसीमधील वीज, पाणी, रस्ते आणि अन्य मूलभूत सुविधांच्या प्रश्नांबाबत उद्योजक मोहन होडावडेकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती. आमदार झाल्यानंतर या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. होडावडेकर यांची एमआयडीसीच्या विकासाबाबत असलेली तळमळ कौतुकास्पद आहे. एमआयडीसीचा विस्तार झाला पाहिजे, नवीन उद्योग आले पाहिजेत आणि स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी ते मनापासून प्रयत्नशील आहेत. त्यांना दिलेला शब्द पूर्ण करत एमआयडीसीमधील प्रलंबित कामे मार्गी लावली जातील. उद्योगवाढीसोबतच प्रदूषण होणार नाही आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागणार नाही, याचीही काळजी घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
कुडाळ मतदारसंघाला राज्यात अग्रेसर बनविण्याचा निर्धार व्यक्त करताना आमदार राणे यांनी कुडाळच्या क्रीडा संकुल आणि स्टेडियमच्या कामाची माहिती दिली. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या क्रीडा प्रबोधिनीच्या माध्यमातून भव्य क्रीडा संकुल उभारण्याबाबत आपण आणि काका कुडाळकर यांनी त्यांची भेट घेऊन मागणी केली होती. या प्रस्तावाला त्यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर तयार करण्यात आलेल्या डिझाइनलाही त्यांनी समाधान व्यक्त केले असून हा प्रकल्प आता पूर्णत्वास जात असल्याचे त्यांनी सांगितले.
कुडाळ शहरातील घनकचरा प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात येणार असून जनतेला दिलेल्या शब्दाप्रमाणे नोव्हेंबर २०३० पूर्वीच हा प्रकल्प पूर्ण करून त्याचे लोकार्पण केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच शहरात नाना-नानी पार्क मंजूर झाले असून त्यासोबत छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. या कामासाठी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून सिंधुरत्न योजनेतून निधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.
मागील दहा वर्षांतील विकासकामांचा अनुशेष भरून काढण्याचे काम आपण करीत आहोत. विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यापेक्षा विकासकामांवर आपला भर असून जनतेने दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्याची ग्वाही आमदार राणे यांनी यावेळी दिली.
* एमआयडीसीच्या विकासामुळे उद्योगांना चालना : मोहन होडावडेकर
यावेळी उद्योजक मोहन होडावडेकर यांनी आमदार निलेश राणे यांचे विशेष आभार मानले. तीन वर्षांपूर्वी कुडाळ एमआयडीसी केवळ नावापुरती अस्तित्वात होती. मात्र, आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून एमआयडीसीमधील विकासकामांना गती मिळाली आहे. पूर्वी रस्त्यांवर दिवाबत्तीची सुविधाही नव्हती; मात्र आज संपूर्ण एमआयडीसी परिसर स्ट्रीट लाइटने उजळून निघाला आहे. विजेचा गंभीर प्रश्न असल्यामुळे उद्योजक येथे उद्योग सुरू करण्यास इच्छुक नव्हते. आता एमआयडीसीमध्ये तब्बल २२ ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित झाले आहेत. ही कुडाळसाठी अभिमानाची बाब आहे, असे त्यांनी सांगितले.
महामार्गाला जोडणारा चारपदरी रस्ता पूर्णत्वास गेल्याने नवीन लहान-मोठे उद्योग सुरू होण्यास चालना मिळाली आहे. आज एमआयडीसीमधून दररोज २५ ते ३० कंटेनर बाहेर जाताना दिसत आहेत. उद्योगांची वाढ, मालवाहतुकीत झालेली वाढ आणि निर्माण होत असलेल्या नव्या संधी या सर्व गोष्टी आमदार निलेश राणे यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधी आणि केलेल्या पाठपुराव्यामुळे शक्य होत आहेत. एमआयडीसीच्या वतीने आमदार निलेश राणे यांचे मनापासून आभार व्यक्त करतो, असे भावनिक उद्गार होडावडेकर यांनी काढले.
* काका कुडाळकर यांनीही व्यक्त केले समाधान
यावेळी काका कुडाळकर यांनी मनोगत व्यक्त केले. खासदार नारायण राणे यांच्या सुरुवातीच्या कार्यकाळापासून विकासकामांचा धडाका आपण पाहत आलो आहोत. आता आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मतदारसंघात विकासाची गंगा वाहू लागली आहे. असा कार्यतत्पर आमदार लाभल्याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.
या भूमिपूजन सोहळ्याला शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, दादा साईल, दीपक नारकर, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, तालुकाप्रमुख विनायक राणे, सभापती मिलिंद नाईक, युवासेना जिल्हाप्रमुख स्वरूप वाळके, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, अरविंद करलकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर, संजय पडते, एमआयडीसी अभियंता अविनाश रेवणकर, उद्योजक मोहन होडावडेकर, नगरसेवक अभि गावडे, रुपेश कानडे यांच्यासह नगरपंचायतीचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कुडाळ एमआयडीसीतील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.












