तिलारी-दोडामार्ग रस्त्याच्या दुरस्तीसाठी आमदार दीपक केसरकर यांची पाहणी; पुलाची होणार पुनर्बांधणी

​दोडामार्ग (प्रतिनिधी):
तिलारी ते दोडामार्ग या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामामुळे निर्माण झालेली दुरवस्था आणि नागरिकांना होत असलेला त्रास याची गंभीर दखल घेत आमदार दीपक केसरकर यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली. रस्ता आणि पुलांचे काम दर्जेदार व ग्रामस्थांना सोयीचे व्हावे, यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत.
​
​तिलारी-दोडामार्ग हा या भागातील दळणवळणाचा कणा मानला जातो. मात्र, सध्या सुरू असलेल्या रस्तेकामामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी आणि गैरसोय होत आहे. याची पाहणी करताना आमदार केसरकर यांनी, काम करताना स्थानिक नागरिकांना कमीत कमी त्रास होईल याची काळजी घेण्यास सांगितले. तसेच कामाचा दर्जा राखून सर्व त्रुटी तातडीने दूर करण्याचे निर्देश पुण्याचे कार्यकारी अभियंता प्रदीप तिवारी व इतर अधिकाऱ्यांना दिले.
​
​या दौऱ्यात तिलारी नदीवरील मिनी कॉलनी येथील अरुंद पुलाचा प्रश्न ऐरणीवर आला. जुना पूल अरुंद असल्याने वाहतुकीत अडथळे येत होते. त्यामुळे या पुलाची नव्याने पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन पुलाचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी वाहनचालकांसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करणे आवश्यक असल्याने, आमदार केसरकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत त्या जागेचीही पाहणी केली व लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश दिले.
​
​या पाहणी दौऱ्यात उपविभागीय अधिकारी वीरसिंग वसावे, उपसभापती गणेशप्रसाद गवस, जिल्हा परिषद सदस्य दीपक गवस व साक्षी तळवडेकर, नायब तहसीलदार प्रज्ञा राजमाने, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, भाजप तालुकाध्यक्ष दीपक गवस, तसेच महायुतीचे विविध पदाधिकारी, सरपंच आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
​या पाहणीमुळे तिलारी-दोडामार्ग रस्ता आणि मिनी कॉलनी पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.