नळपाणी योजना पाण्याच्या टाकीवरून राजकारण करणाऱ्या महेश जावकरांना बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकरांचे सडेतोड प्रत्युत्तर!
राजकोटसह संपूर्ण मालवण शहराला उच्च दाबाने मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध
मालवण | प्रतिनिधी : ‘खोटे बोला आणि रेटून बोला’, जनतेची दिशाभूल करणे हाच उद्योग मालवण शहरात उबाठा गटाकडून सुरू आहे. आता धामापूर नळपाणी योजनेच्या पाण्याच्या टाकीचा मुद्दा पुढे करून जनतेने नाकारलेले आणि निवडणुकीत पराभवाची धूळ चारलेले महेश जावकर जनतेची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. मात्र, नव्याने उभारण्यात येणाऱ्या नळपाणी योजनेच्या माध्यमातून राजकोट परिसरासह संपूर्ण मालवण शहरातील उच्च दाबाने मुबलक पाणीपुरवठा व्हावा, यासाठी मालवण नगरपरिषद कटिबद्ध असून, त्यादृष्टीने नियोजनबद्ध कार्यवाही सुरू आहे, असे स्पष्ट करत मालवण नगरपरिषदेचे बांधकाम सभापती सहदेव बापार्डेकर यांनी महेश जावकर यांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
धामापूर नळपाणी योजनेच्या प्रस्तावित पाण्याच्या टाकीच्या जागेवरून महेश जावकर यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा समाचार घेताना बापार्डेकर म्हणाले की, जावकर आणि त्यांच्या उबाठा गटामध्ये विकास करण्याची क्षमता नाही, हे जनतेने ओळखूनच त्यांना निवडणुकीत पराभूत केले. त्यामुळे विकासकामांवर निराधार आरोप करण्यापेक्षा त्यांनी आपल्या पराभवाचे आत्मचिंतन करावे. आपण मांडत असलेले मुद्दे चुकीचे आणि दिशाभूल करणारे असल्याचा आरोपही बापार्डेकर यांनी केला.
राजकोट परिसरातील प्रत्येक नागरिकाला उच्च दाबाने आणि मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी उंच ठिकाणी पाण्याची टाकी उभारणे आवश्यक आहे. या टाकीतून राजकोट परिसराला स्वतंत्र जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. त्याचप्रमाणे मालवण शहरातील विविध भागांनाही स्वतंत्र जलवाहिन्यांच्या माध्यमातून सुरळीत आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा व्हावा, यासाठी आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष आणि आम्ही सर्व नगरसेवक प्रयत्नशील असल्याचे बापार्डेकर यांनी सांगितले.
प्रशासन आणि संबंधित यंत्रणेमार्फत आवश्यक सर्वेक्षण करून कुंभारमाठ येथील उंच भागातील जागा पाण्याच्या टाकीसाठी निश्चित करण्यात येत आहे. या प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळण्यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव सादर करण्याची कार्यवाही सुरू आहे. आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतरच पुढील काम हाती घेण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेत तांत्रिक बाबींचा विचार करून संबंधित तज्ज्ञ आणि प्रशासकीय यंत्रणा अंतिम निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
असे असताना सर्व तांत्रिक बाबींची माहिती तसेच स्वतःलाच सगळे समजते आणि आपण खोटे बोलणार ते जनता खरे मानणार असे जावकर यांना वाटत असेल तर त्यांच्या भ्रमाचा भोपळा निवडणुकीत फुटला हे जावकर विसरलेत असावे.
राजकारण करण्यासाठी व जनतेत संभ्रम निर्माण व्हावा यासाठी पाण्याची टाकी एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवली, त्यामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होणार, व अन्य खोटे प्दावे करून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न जावकर यांनी थांबवावा. जनतेच्या हिताच्या दृष्टीने होत असलेल्या विकासकामांमध्ये सहकार्य करता येत नसेल, तर किमान सुरू असलेल्या विकासप्रक्रियेत अडथळे निर्माण करू नयेत, असा टोलाही बापार्डेकर यांनी लगावला.
राजकोट परिसरातील सर्व भागांना स्वतंत्र जलवाहिनीद्वारे उच्च दाबाने मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. याबाबत यापूर्वीच नियोजन करण्यात आले असून, त्यानुसार आवश्यक कार्यवाही सुरू आहे. मालवण शहरातील प्रत्येक नागरिकाला पुरेसा आणि सुरळीत पाणीपुरवठा उपलब्ध करून देणे हेच नगरपरिषदेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यामुळे नागरिक कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यांना बळी पडणार नाहीत. असेही बांधकाम सभापती सहदेव बापार्डेकर यांनी केले.
मालवणच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी नगरपरिषद प्रयत्नशील आहे. विरोधकांनी पाणीपुरवठ्यासारख्या महत्त्वाच्या विषयावर राजकारण करण्याऐवजी शहराच्या हिताला प्राधान्य देणे आवश्यक आहे. राजकोटसह संपूर्ण मालवण शहराला मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेली प्रक्रिया तांत्रिक निकष आणि प्रशासकीय मंजुरीनुसारच पूर्ण केली जाईल. त्यामुळे महेश जावकर यांनी चुकीची माहिती पसरवून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करू नये, जनतेची दिशाभूल करण्याचे उद्योग थांबवावेत असा सूचक टोला सहदेव बापार्डेकर यांनी लगावाला .













