खारेपाटणमध्ये भव्य बचतगट दीपावली महोत्सवाचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन

महिला बचतगटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ

२० स्टॉल्समधून विविध वस्तूंची विक्री

कणकवली / खारेपाटण : ग्रामीण भागातील होतकरू महिला बचतगटांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शिवसेना कणकवली तालुक्याच्या वतीने खारेपाटण येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य बचतगट दीपावली महोत्सव २०२६ चे उद्घाटन रविवारी सायंकाळी ६ वाजता कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार निलेश राणे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

दि. १ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत खारेपाटण एस.टी. बसस्थानकासमोरील पटांगणात हा दीपावली बाजार भरविण्यात आला आहे. या उद्घाटन प्रसंगी शिवसेना नेते संजय आंग्रे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती सौ. रुहिता तांबे, देवगड उपसभापती, केळवली जिल्हा परिषद सदस्य श्री. सूद साहेब, पंचायत समिती सदस्य बंड्या मोहरकर, शिवसेना रत्नागिरी जिल्हाप्रमुख अशपाक हाजू, पराडकर, पंचायत समिती सदस्य गुरुप्रसाद शिंदे, श्री. वायगणकर, सुहास राऊत, खारेपाटणचे माजी सरपंच रमाकांत राऊत, भाजप शक्तिकेंद्रप्रमुख सूर्यकांत भालेकर, सामाजिक कार्यकर्ते संकेत शेट्ये, मधुकर शेठ गुरव, प्रवीण लोकरे, भाऊ राणे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार निलेश राणे म्हणाले की, खारेपाटणमधील शिवसेना कार्यकर्ते मंगेश गुरव आणि त्यांचे सहकारी दरवर्षी दीपावली बाजाराचे आयोजन करून येथील बचतगटातील महिलांना बाजारपेठ उपलब्ध करून देत आहेत. ही बाब कौतुकास्पद आहे. या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व महिलांचे मी अभिनंदन करतो. मात्र, खारेपाटण गावात येणारा मुख्य रस्ता ही मोठी समस्या आहे. या रस्त्याच्या प्रश्नासाठी मी निश्चित प्रयत्न करेन. पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या मतदारसंघात ज्याप्रमाणे विकासकामे केली आहेत, त्याचप्रमाणे ते खारेपाटणमध्येही विकासकामे करतील. लवकरच खारेपाटणचा चांगला आणि चकचकीत विकास झालेला तुम्हाला दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुढे बोलताना आमदार निलेश राणे म्हणाले की, सध्या राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता खारेपाटण गावात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी बंधाऱ्याचे काम हाती घेणे आवश्यक आहे. तसेच खारे आणि गोडे पाणी वेगळे करण्यासाठी बंधारा बांधण्याचे नियोजन करावे. या कामासाठी लागणारा निधी निश्चितपणे उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

शासनाच्या महिला सक्षमीकरण उपक्रमाला हातभार लावत ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंना बाजारपेठ मिळावी, त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना मिळावी आणि महिला बचतगटांच्या व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे, हा या दीपावली बाजार महोत्सवामागील प्रमुख हेतू असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

यावेळी शिवसेना नेते संजय आंग्रे, रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य श्री. सूद, देवगड सभापती लोके आणि समाजकल्याण सभापती रुहिता तांबे यांनी आपली मनोगते व्यक्त करून दीपावली बाजाराला शुभेच्छा दिल्या.

या दीपावली बाजारामध्ये महिला बचतगटांच्या वतीने एकूण २० स्टॉल उभारण्यात आले आहेत. यामध्ये दिवाळीचा फराळ, आकाशकंदील, शोभेच्या वस्तू, दिवे, मेणबत्त्या, पणत्या, रांगोळी तसेच घरगुती वापरातील विविध दर्जेदार उत्पादने एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

यावेळी आमदार निलेश राणे यांनी महिला बचतगटांच्या सदस्यांशी संवाद साधला. तसेच सर्व स्टॉलला भेटी देऊन दीपावली बाजाराची पाहणी केली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख मंगेश गुरव यांनी केले.